बीड: ३७ हजारांची लाच घेताना रामानंदतीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचा लिपीक ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात | पुढारी

बीड: ३७ हजारांची लाच घेताना रामानंदतीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचा लिपीक 'लाचलुचपत'च्या जाळ्यात

अंबाजोगाई; पुढारी वृत्तसेवा: अंबाजोगाई येथील स्वामी रामानंदतीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता कार्यालयातील कनिष्ठ लिपिकाला ३७ हजारांची लाच घेताना बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले. अशोक अच्चुतराव नाईकवाडे (वय ४२) असे अटक केलेल्या लिपिकाचे नाव आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुख्य रस्त्यावरील हॉटेल आशियाना येथे आज (दि. १०) ही कारवाई करण्यात आली.

या बाबतची अधिक माहिती अशी की, अधिष्ठाता कार्यालयातील लिपीक अशोक नाईकवाडे याने तक्रारदार यांच्याकडे त्यांचे मयत सासरे यांच्या जागेवर त्यांच्या पत्नीस अनुकंपावर नोकरी लावतो, म्हणून ८० हजार रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर ३७ हजार रुपयांवर तडजोड करण्यात आली. आज (दि.१०) स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या समोरील आशियाना हॉटेल येथे ३७ हजारांची लाच स्वीकारताना अशोक नाईकवाडे यास रंगेहाथ पकडण्यात आले.

ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल धस यांनी केली. यावेळी सापळा पथकात पोलीस अंमलदार भरत गारदे, अविनाश गवळी, चालक गणेश म्हेत्रे यांचा समावेश होता.

हेही वाचा 

Back to top button