बीड : जुगारावर कारवाईस गेलेल्या पोलीस निरीक्षकावरच हल्ला | पुढारी

बीड : जुगारावर कारवाईस गेलेल्या पोलीस निरीक्षकावरच हल्ला

बीड : पुढारी वृत्‍तसेवा माजलगाव तालुक्यातील छत्रबोरगाव येथे चैत्र महिन्या निमित्त देवीची यात्रा भरली होती. या यात्रेत चालू असलेला जुगार अड्डा पोलीस बंद करत हाेते. यावेळी त्यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी काल (गुरुवार) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास दगडफेक केली. यामध्ये ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश खटकळ हे जखमी झाले आहेत. दगडफेक करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध ग्रामीण पोलिस स्‍टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चैत्र महिना असल्याने तालुक्यात अनेक ठिकाणी यात्रा भरत असतात. त्याचप्रमाणे छत्र बोरगाव येथे देखील देवीची यात्रा भरली होती. यात्रा असलेल्‍या ठिकाणी विविध वस्तूंच्या दुकानात कपड्यांसह खेळाचे साहित्य विक्रीसाठी आलेले असते. या ठिकाणी जुगार, तमाशा या गोष्‍टीही चालतात. या यात्रेत एका ठिकाणी सोरट नावाचा जुगार चालू असल्याची माहिती ग्रामीण पोलीसांना मिळाली. त्यानंतर येथील पोलीस या यात्रेत पोहोचले.

पोलिसांनी हा जुगार बंद करण्यासाठी सांगितले असता, पोलीस व जुगार चालक यांच्यात वाद झाला. यावेळी कोणीतरी पोलिसांवर दगडफेक केली. यामध्ये ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश खटकळ यांना २-३ ठिकाणी गंभीर दुखापत झाली.
सपोनि योगेश खटकळ यांच्या फिर्यादीवरून परमेश्वर रावसाहेब जाधव, परमेश्वर विठ्ठल जाधव, अक्षय परमेश्वर जाधव यांच्यासह इतर अज्ञात १५ ते २० लोकांवर ग्रामीण पोलीसात शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयसिंह जोनवल हे करत आहेत.

Back to top button