पुढारी विश्लेषण : उद्धव ठाकरेंचा झंझावात; शिंदे गटाला इशारा | पुढारी

पुढारी विश्लेषण : उद्धव ठाकरेंचा झंझावात; शिंदे गटाला इशारा

  • पुढारी विश्लेषण, धनंजय लांबे 

छत्रपती संभाजीनगर : उद्धव ठाकरे यांच्या झंझावाताने रविवारी शिंदे गटाला जबर धक्का बसला. महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या वज्रमूठ सभेमुळे जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. सभेला झालेली प्रचंड गर्दी आणि ठाकरे यांना वाक्यागणिक मिळालेला प्रतिसाद पाहता आगामी निवडणूक भाजप आणि शिवसेनेला सोपी नाही, याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर आयोजित करण्यात आलेली उद्धव ठाकरे यांची ही पहिलीच सभा. महाविकास आघाडी राज्यभरात अशा सभा घेणार असून, छत्रपती संभाजीनगरातील सभेची जबाबदारी मूळ शिवसेनेवर टाकण्यात आली होती. जिल्ह्यातील पाच आमदार शिंदे यांच्यासमवेत गेल्यानंतर मूळ शिवसेनेसोबत किती लोक आहेत, या सभेला कसा प्रतिसाद मिळतो, याबद्दल मराठवाडाभरात कमालीची उत्सुकता होती. ऐतिहासिक मराठवाडा सांस्कृतिक मंडळ पूर्ण भरल्यानंतरही आसपासच्या रस्त्यांवर उभे राहून लोकांनी उद्धव ठाकरे यांचे भाषण ऐकले. त्यामुळ शिवसेनेचा करिष्मा अजूनही कमी झालेला नाही, याचेच संकेत मिळाले. सत्तेतील भाजप-शिवसेना आणि महाविकास आघाडी अशा सर्वच पक्षांनी 2024 च्या निवडणुकीचे बिगुल फुंकले आहे. काही पक्षांनी तर लोकसभा आणि विधानसभेचे उमेदवारही निश्चित केले आहेत. सर्वच पक्षांच्या नेत्यांचे दौरे मराठवाड्यात सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शहरात आयोजित करण्यात आलेली ही पहिलीच सभा. सभेची जबाबदारी ठाकरे यांनी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर टाकली होती. ती त्यांनी यशस्वीपणे पार पाडली.

ठाकरे नावाचा करिष्मा

मराठवाडा पातळीवरील सभा असल्याचे सांगितले जात असले तरी सभेला लोटलेला जनसागर छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यातूनच आलेला होता. त्यामुळे चर्चा होती, ती या भागातील मूळ शिवसेनेच्या प्रभावाची. या शहराने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विराट सभा पाहिल्या आहेत. त्याचीच पुनरावृत्ती रविवारी (दि. 2 एप्रिल) झाल्यामुळे ठाकरे नावाचा करिष्मा कायम असल्याचे मत अनेक जुन्या शिवसैनिकांनी व्यक्त केले. आमदारांनी पक्ष सोडलेला असला तरी कार्यकर्ते, लोक मात्र मूळ शिवसेनेसोबतच आहेत, याचे स्पष्ट संकेत या सभेतून मिळाले.

वास्तविक, तीनही पक्षांच्या नेते सभेत काय बोलतात याविषयी उत्सुकता होती. सत्तांतरानंतर बहुसंख्य कार्यकर्ते पक्षांची साथ सोडतात, हा या नेत्यांनाही अनुभव आहे. तथापि, सत्ता नसताना लोकांचे प्रेम व्यक्त झाल्यामुळे सर्वच नेते भारावून गेल्याचे पाहावयास मिळाले. भाजप आणि शिंदे गटाला वर्षभरावर आलेल्या निवडणुकीत यश मिळविण्यासाठी हे प्रेम कमवावे लागणार आहे. अर्थात, निवडणुकीची गणिते वेगळी आहेत. उमेदवार आणि पक्षाची भूमिका या दोन्ही गोष्टींना विधानसभा व लोकसभा निवडणुकीत मतदार महत्त्व देत आले आहेत. नुकत्याच झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर एमआयएमसारख्या पक्षांचेही आव्हान आहे. त्यामुळे आजच निवडणुकीतील अंदाज बांधणे अवघड असले तरी मूळ शिवसेनेचा दबदबा या सभेच्या निमित्ताने अधोरेखित झाला आहे.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुद्देसूदपणे केंद्र सरकारवर आणि राज्यातील भाजप-शिंदे गटाच्या कारभारावर थेट टीका केली. देशाची राज्य घटना पायदळी तुडणार्‍यांना मविका तुडवेल, असा इशाराच त्यांनी दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि काँग्रेसचे बाळासाहेब थोरात व अशोक चव्हाण यांनीही सत्ताधार्‍यांवर हल्ला चढवला. धमक असेल तर सावरकरांना भारतरत्न द्या, असे आव्हानच अजित पवार यांनी दिले. अशोक चव्हाण यांनी अशा कितीही गौरवयात्रा काढल्या तरी फरक पडणार नाही, असे सांगत राहुल गांधी यांना अडचणीत आणल्याचा आरोप केंद्रातील सरकारवर केला. थोरात यांनी राज्यात 180 पेक्षा जास्त जागा जिंकू, असा दावा केला. गेल्याच आठवड्यात शहरात ठिकाणी उसळलेल्या दंगलीचा उल्लेख मात्र सर्वच नेत्यांनी कटाक्षाने टाळला.

आता सत्ता नसताना कार्यकर्त्यांची फळी सांभाळणे आणि वेळोवेळी सत्ताधार्‍यांची राजकीय कोंडी करणे ही आव्हाने या तीनही पक्षांसमोर आहेत. शिंदे गटाला मात्र या टापूत यश मिळविण्यासाठी आघाडीपेक्षा जास्त परिश्रम घ्यावे लागतील, हे या सभेने दाखवून दिले आहे.

सावरकर गौरव यात्रा

वज्रमूठ सभेच्याच दिवशी शहरातून भाजप आणि शिंदे गटाच्या वतीने वीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली. या यात्रेच्या निमित्ताने महाविकास आघाडीवर पालकमंत्री संदीपान भुमरे, सहकार मंत्री अतुल सावे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड प्रभूतींनी तोंडसुख घेतले. प्रतिसादाच्या बाबतीत ही गौरव यात्रा तुलनेने जेमतेमच ठरली.

Back to top button