छत्रपती संभाजीनगर : सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने दोन गटांत राडा | पुढारी

छत्रपती संभाजीनगर : सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने दोन गटांत राडा

कन्नड ; पुढारी वृत्‍तसेवा : शहर हद्दीत काल (सोमवार) संध्याकाळच्या सुमारास तालुक्यातील अंधानेर येथील एका इसमाने त्याच्याकडील मोबाईलवर आक्षेपार्ह व्हिडीओ तयार करून तो वापरत असलेल्या मोबाईलवरील इंस्ट्राग्रामवर पोस्ट केला. त्यावरून कन्नड शहरातील एका गटाच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणात शहर पोलिस स्‍टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर पोस्टमुळे एका समाजातील २० ते २५ इसमांनी रागातून अंधानेर येथे पोस्ट व्हायरल करणाऱ्या इसमाच्या नातेवाईकाच्या घरी जावून त्यांना मारहाण केली. त्यावरुन पोलिस ठाणे कन्नड शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्यात आतापर्यंत आठ संशयीत आरोपींना अटक करण्यात आली आहे. इतर आरोपींचा शोध घेवून त्‍यांना अटक करण्यात येणार आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राजीव तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक भूषण सोनार हे करीत आहेत. सदरच्या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया, अप्पर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार, उपविभागीय पोलिस अधिकारी उपविभाग सिल्लोड मराठे यांनी सदरच्या घटनास्थळी जावून भेट दिली असून, दोन्ही समाजातील बांधवाना पोलिस अधिक्षक मनिष कलवानिया यांनी दोन्ही समजातील नागरिकांनी जाती धर्मावरुन दोन समाजात तेढ निर्माण होतील अशा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करु नये. सामाजिक शांतता व एकोपा अबाधित ठेवण्यात सहकार्य करावे असे अवाहन करण्यात आले आहे. अशा पोस्ट केल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. दरम्‍यान, सध्या कन्नड शहरात शांतता आहे.

हेही वाचा : 

Back to top button