छत्रपती संभाजीनगर : झोलेगावात विहिरीच्या मलब्यात दबले पाच परप्रांतीय मजूर | पुढारी

छत्रपती संभाजीनगर : झोलेगावात विहिरीच्या मलब्यात दबले पाच परप्रांतीय मजूर

वैजापूर, पुढारी वृत्तसेवा : विहिरीचे काम सुरू असताना ती अचानक ढासळून मलब्यात पाच परप्रांतीय मजूर दबल्याची घटना सोमवारी (दि.४) दुपारच्या सुमारास तालुक्यातील झोलेगाव शिवारात घडली. यातील दोन मजुरांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असून अन्य दबलेल्या तीन मजुरांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी जेसीबी यंत्राच्या सहाय्याने विहिरीतील मलबा बाहेर काढण्यात येत असून पोलीस यंत्रणा व गावातील नागरिकांकडून युध्दपातळीवर मदतकार्य सुरू आहे. रतनसिंग रावत (वय २८), छोटू भिल (२८) वर्ष हे दोघे किरकोळ जखमी झाले आहे. सिताराम रावत (३५), महावीर रावत (३८) , बनजी गुज्जर (३५) सर्व रा. जीवना राजस्थान अशी जखमींची नावे आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील झोलेगाव शिवारातील एका नवीन विहिरीचे खोदकाम सुरू होते. या ठिकाणी राजस्थान येथील मजूर काम करीत होते. सोमवारी नेहमीप्रमाणे विहिरीत मजूर काम करीत असताना विहिर अचानक ढासळून तिचा मलबा विहिरीत पडला. त्याचवेळी विहिरीत पाच परप्रांतीय मजूर काम करीत असताना ते मलब्याखाली दबल्या गेले. ही घटना दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. ही घटना आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती शिऊर पोलीस ठाण्यासह गावातील नागरिकांना कळविली. घटनेचे गांभीर्य ओळखून शिऊर पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप व पोलिसांचा ताफा घटनास्थळी रवाना झाला.

हेही वाचलंत का?

Back to top button