बीड: गेवराई येथे ३ हजारांची लाच घेताना तलाठी 'लाचलुचपत'च्या जाळ्यात

गेवराई, पुढारी वृत्तसेवा : खरेदी केलेल्या प्लॉटची फेरफार ऑनलाईन नोंद करण्यासाठी ३ हजार रूपयांची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ अटक करण्यात आली. अमित नाना तरवरे (वय ३२ रा. नाईकनगर तांडा, गेवराई) असे अटक केलेल्या तलाठ्याचे नाव आहे. ही कारवाई बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज (दि.२४) दुपारी गेवराई येथे केली. या घटनेनंतर खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमित तरवरे हा गेवराई तालुक्यातील दैठण सज्जाचा तलाठी आहे. परंतु, त्याच्याकडे तलवाडा सज्जाचा अतिरिक्त पदभार होता. याच भागातील एका व्यक्तीच्या खरेदी केलेल्या प्लॉटची फेरफार ऑनलाईन नोंद करण्यासाठी तरवरे याने ३ हजार रूपयांची लाच मागितली. त्यानंतर संबंधित व्यक्तीने बीड एसीबीकडे तक्रार केली. त्याप्रमाणे आज दुपारी सापळा लावण्यात आला. त्यानंतर पंचासमक्ष ३ हजार रूपये घेताच एसीबीने त्याला रंगेहाथ पकडले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल खांबे, पोलीस उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल धस, अंमलदार भारत गारदे, अविनाश गवळी आदींनी केली.
हेही वाचा
- बीड : केजमध्ये दोन गटात वाद : शहरात तणावपूर्ण शांतता
- बीड : सालगड्याचा मालकाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; संशयिताची पोलीस कोठडीत रवानगी
- बीड : सावरगावमध्ये चोरट्यांनी चार घरे फोडली