

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पोपट पकडण्यासाठी झाडावर चढला मात्र हात लाकडाच्या ढोलीत अडकल्याने एक १४ वर्षीय मुलगा अडकून पडल्याचा प्रकार हर्सल भागात गुरुवारी (ता. २३) सायंकाळी घडला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत त्याला झाडावरून खाली उतरवले.
हर्सल पोलिस स्टेशन परिसरात मनोज कुमार हा १४ वर्षीय मुलगा गुरुवारी सायंकाळी पोपट पकडण्यासाठी एका ३० फूट उंचीच्या झाडावर चढला, पोपटाचे घर असलेल्या लाकडाच्या ढोलीत हात घातला, पण त्याचा हात त्यात अडकून पडला. हात निघत नसल्याने त्याने आरडाओरड करण्यास सुरुवात केली दरम्यान परिसरातील नागरिकांना प्रकार लक्षात येताच त्यांनी अग्निशमन विभागाला माहिती दिली. अग्रिशमन विभागाचे उप अग्निशमन अधिकारी विजय राठोड, जवान कृष्णा होळंबे, रमेश सोनवणे, योगेश दुधे, रामेश्वर बमणे, राजू ताठे, वाहनचालक योगेश दुधे यांनी धाव घेतली. त्यांनी मनोज कुमार यास सुखरूप खाली आणले. सुमारे दोन तास तो झाडावर अडकून पडला होता.