चंद्र-शुक्र यांची पिधान युती पाहण्याची आज अपूर्व संधी | पुढारी

चंद्र-शुक्र यांची पिधान युती पाहण्याची आज अपूर्व संधी

छत्रपती संभाजीनगर; पुढारी वृत्तसेवा :  अंतराळातील खगोलीय घटना पाहण्याची उत्सुकता अनेकांना असते. अशीच एक चंद्र शुक्राची पिधान युती शुक्रवारी (दि. २४) दुपारी ४.१५ ते सायंकाळी ५.५० यादरम्यान राज्यातील सर्वच ठिकाणी पाहायला मिळणार आहे. ही दुर्मीळ खगोलीय घटना सूर्यास्तापूर्वी होणार असल्याने दुर्बिणीतून पाहता येईल, अशी माहिती येथील एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी दिली.

शुक्रवारी दुपारी ४.१५ वाजता पश्चिम आकाशात चंद्रकोरीच्या वरील बाजूकडून शुक्र ग्रह स्पर्श करेल व तो चंद्राच्या पाठीमागे जाईल. यावेळी शुक्र पृथ्वीपासून १८ कोटी ५३ लाख ८१ हजार किलोमीटर अंतरावर असेल. त्याची तेजस्विता उणे ३.९८ असेल. त्याचवेळी आपल्या पृथ्वीचा उपग्रह चंद्र मात्र ३ लाख ७२ हजार ७०२ किलोमीटर अंतरावर असेल. त्याची तेजस्विता उणे ८.२९ असेल. ही घटना घडताना पश्चिम आकाशात सूर्य मावळलेला नसेल. त्यामुळे साध्या डोळ्यांनी ही खगोलीय घटना पाहता येणार नाही, असे औंधकर यांनी सांगितले.

Back to top button