गारपीट,अवकाळीमुळे निम्म्या मराठवाड्यातील पिके आडवी; भरपाईची मागणी

गारपीट,अवकाळीमुळे निम्म्या मराठवाड्यातील पिके आडवी; भरपाईची मागणी
Published on
Updated on

लातूर/बीड/हिंगोली; पुढारी वत्तसेवा :  मराठवाड्यात शनिवारी पुन्हा लातूर, हिंगोली, बीड, परभणी, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतील काही भागांत वादळी वार्‍यासह गारपीट झाली. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळीमुळे निम्म्या मराठवाड्यात शेतातील उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले. तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. रेणापूर तालुक्यात दुपारी दोन वाजता विविध ठिकाणी वादळी वार्‍यांसह गारांचा मोठा पाऊस झाला. यामुळे द्राक्ष बागांचे अतोनात नुकसान झाले. गहू, ज्वारी, करडई, हरभर्‍याला अवकाळीचा फटका बसला. चाकूर व जळकोट तालुक्यांतही विविध ठिकाणी पाऊस व गारांचा मारा झाला. अनेक घरांचे पत्रे उडून गेले. देवणी वनिलंगा तालुक्यात अवकाळीने थैमान घातले.

16 हजार हेक्टरवरील पिकांना फटका

14 मार्चपासून सातत्याने अवकाळी पावसाचा मराठवाड्याला तडाखा बसत आहे. या अवकाळीमुळे पाच दिवसांत विविध ठिकाणी 6 जण ठार झाले असून, 36 जण जखमी झाले आहेत; तर 16 हजार 35 हेक्टरवरील रब्बी पिकांना फटका बसला आहे.

वीज कोसळून विद्यार्थिनीचा मृत्यू

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील माल्लेर चक येथील एका विद्यार्थिनीचा वीज कोसळून मृत्यू झाला. स्वीटी बंडू सोमनकर (वय 15) असे तिचे नाव आहे. ती कुनघाडा येथील विश्वशांती विद्यालयात नववीच्या वर्गात शिकत होती. शाळा सुटल्यानंतर ती सायकलने दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या माल्लेर चक या आपल्या गावाकडे जात होती.

वीज कोसळून शेतकर्‍याचा मृत्यू

नाशिक : सिन्नर तालुक्यातील मेंढी येथे वीज कोसळून शेतकरी बाळू जयराम गीते (वय 60) यांचा मृत्यू झाला. शनिवारी सायंकाळी ही घटना घडली. वडांगळी-मेंढी रोडवरील शेतात गीते काम करीत होते.

पावसाचा जोर उद्यापासून ओसरणार

पश्चिमी चक्रवाताचा जोर कमी होत असल्याने वार्‍यांचा वेगही मंदावत आहे. परिणामी, महाराष्ट्रात सोमवार (दि. 20) पासून पावसाचा जोर कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. रविवारी मात्र राज्यातील बहुतांश भागांत पावसाचा अंदाज आहे. बहुतांश राज्यात 22 मार्चपर्यंत पावसाचा अंदाज आहे. फक्त महाराष्ट्र, गुजरात राज्यांत पावसाचा जोर कमी होत असून, सोमवारपासून राज्याच्या बहुतांश भागांतून ढग गायब होऊन आकाश निरभ्र होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. रविवारी राज्यातील बहुतांश भागांत हलका पाऊस होईल, त्यानंतर 20 रोजी तो कमी होणार आहे. उत्तर भारतात मात्र 22 मार्चपर्यंत पावसाचा अंदाज आहे.

नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना भरपाई : मुख्यमंत्री शिंदे

सिन्नर; पुढारी वृत्तसेवा : हे सरकार शेतकर्‍यांचे, सर्वसामान्यांचे आणि गोपीनाथ मुंडे यांच्या विचारांवर चालणारे असल्याने शेतकर्‍यांनी घाबरून जाऊ नये. अवकाळीने झालेल्या नुकसानीची भरपाई शासन देईल, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना आधार दिला. स्व. गोपीनाथ मुंडे स्मारक लोकार्पणाचा कार्यक्रम सुरू असतानाच पाऊस सुरू झाल्यानंतर त्यांनी हा दिलासा दिला. मुख्यमंत्र्यांनी ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी प्रमुख शहरांमध्ये वसतिगृहे, हॉस्पिटल उभारण्यात येतील आणि स्मारकही होईल, असे आश्वस्त केले. ऊसतोड कामगार महामंडळास निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे आश्वासन देऊन गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतींना अभिवादन केले.

नाशिक जिल्ह्यात सलग दुसर्‍या दिवशीही गारपीट

जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी ठिकठिकाणी विजांचा कडकडाट व वादळी वार्‍यांसह अवकाळी पावसाने हजेरी लावली; तर चांदवड, नांदगाव, सिन्नर-इगतपुरीचा पूर्व भाग, कळवण आणि निफाडच्या, त्र्यंबकेश्वरच्या काही भागांत जोरदार गारपीट झाल्याने तेथे रब्बी हंगामातील कांदा, गहू, हरभरा पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. द्राक्ष बागा आणि टरबुजाचेही प्रचंड नुकसान झाले. नाशिक शहरासह देवळा व नांदगावमध्ये जोरदार सरी बरसल्या. येत्या 48 तासांत जिल्ह्याला अवकाळीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. जिल्ह्यात घोटी, इगतपुरी, त्र्यंबकपट्ट्यात जोरदार पाऊस झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news