लातूर: रेणापूर तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा; पिकांचे मोठे नुकसान | पुढारी

लातूर: रेणापूर तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा; पिकांचे मोठे नुकसान

रेणापूर; पुढारी वृत्तसेवा : रेणापूर तालुक्यात शनिवारी (दि.१८ ) दुपारी दोनच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह गारांचा पाऊस झाल्याने शेतात उभ्या असलेल्या रब्बी पिकांना मोठा फटका बसला. गारांमुळे द्राक्ष, आंबा, भाजीपालासह इतर फळबागांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार रेणापूरसह खरोळा, कारेपूर, पानगाव, पोहरेगाव महसूल मंडळातील बहुतांश ठिकाणी शुक्रवारी चार वाजण्याच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला होता. परत शनिवारी दुपारी दोन वाजता वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. २० ते ३० एमएम व मध्यम आकाराच्या गारा पडल्याने द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले. आंबा व इतर फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसाने गहू, हरभरा, ज्वारी, करडी या रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

रेणापूर तालुक्यातील खरोळा, कारेपूर, पानगाव, आनंदवाडी, तळणी, कुभारवाडी, मोहगाव, पळशी, पोहरेगाव, दर्जीबोरगाव, शेरा, कामखेडा आदी ठिकाणी शनिवारी दुपारी दोनपासून वादळीवाऱ्यासह गारांचा मोठा पाऊस झाला. तळणी – मोहगाव परिसरातील द्राक्ष बागांचे अतोनात नुकसान झाल्याची माहिती बालाजी बरुरे यांनी दिली. शिवाय या अवकाळी पावसाने भाजीपाल्याचेही मोठे नुकसान झाले आहे. शेतात व रस्त्याच्या कडेला गारांचे ढीग साचले होते. त्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.

हेही वाचा 

Back to top button