अवकाळी पावसाने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

जालना / परभणी, पुढारी वृत्तसेवा : मराठवाड्यात अनेक ठिकाणी गुरुवारी वादळी वारे, वीजा, गारांसह पावसाने हजेरी लावली. पावसामुळे रब्बी हंगामातील काढणीस आलेल्या गहू, हरभरा तसेच द्राक्ष, आंबा, मोसंबी या फळबागाचे नुकसान झाले. वादळी वाऱ्यामुळे आंब्याचा मोहर गळून पडला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे.
जालना शहरात बुधवारपासून ढगाळ वातावरण होते. गुरुवारी सकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्यानंतर दुपारी साडेचार वाजता वादळी वारे व विजेच्या कडकडाटासह पावसास सुरुवात झाली. पावसामुळे मोंढ्यातील शेतमालाच्या खरेदी विक्रीवर परिणाम झाला. नांदेड शहरासह जिल्ह्याला अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला असून जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वार्यासह गारपीट झाली या पावसामुळे नागरिकांच्या घरावरील पत्रे उडून गेली आहेत. झोपड्यांचेही नुकसान झाले आहे. जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या भागातील पिकांचे तातडीने पंचनामे करावेत तसेच नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी खा. प्रताप पाटील चिखलीकर यांनी केली असून याबाबत केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार आहोत. उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांची भेट घेऊन नुकसानग्रस्तांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
लोहा, धर्माबाद, बारड, मुदखेड येथे पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. मुदखेड तालुक्यातील बारड, डोंगरगाव, शेंबोली, खांबाळा, ईजळी, सीता बोरगाव, आदी गावात वादळी वार्यांसह पाऊस झाला. वीज पडून देऊबाई भालेराव व गणेश भालेराव (रा. बोरगाव सीता) हे जखमी झाले. शेंबोली येथील पंढरी वडेपल्ली पत्राचा मार लागून जखमी झाले. रोही पिंपळगाव (शंकरनगर) येथील शेतकरी दत्ता बालाजी कोकणे यांच्या पाठीवर झाड पडल्याने कमरेला जबर मार लागला आहे