बीड : पावडरपासून बनावट दूध बनविणाऱ्यांवर कारवाई; ८ लाखांचा मुद्देमाल जप्त | पुढारी

बीड : पावडरपासून बनावट दूध बनविणाऱ्यांवर कारवाई; ८ लाखांचा मुद्देमाल जप्त

आष्टी (बीड), पुढारी वृत्तसेवा : आष्टी तालुक्यामध्ये दूध उत्पादन हा शेतकर्‍यांचा जोडधंदा असून सुमारे सव्वा दोन लाख लिटर्स दूध उत्पादन केले जाते. आष्टी पोलीस आणि अन्न, औषध भेसळ प्रतिबंधक विभागाने संयुक्तपणे कारवाई करून आष्टी शहरातील संभाजीनगर परिसरातील एका घरातून १३२ गोण्या पावडर, रसायन आणि २२० पाम तेलाचे डबे जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी जगदंबा मिल्क अॅन्ड प्रॉडक्ट्सचे संचालक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश शिंदे यांच्यासह अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आष्टी पोलीस स्टेशनचे नव्याने पदभार स्वीकारलेले पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांना आष्टीच्या पेट्रोल पंपा मागील संभाजीनगर परिसरामध्ये पिठाच्या गिरणी जवळील एका घरात बनावट दूध तयार करण्यासाठी लागणारे पाम तेल डबे, आणि पावडर यांच्या गोण्या एका दोन वाहनातून उतरवल्या जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक हेमंत कदम आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय देशमुख यांनी बीड येथील अन्न व औषधी प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त सय्यद इम्रान हाश्मी आणि नमुना सहाय्यक मुक्तार शेख यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले.

अन्न व औषधी प्रशासनाने आवश्यक नमुने तपासण्यासाठी घेऊन पंचनामा करून दोन चारचाकी वाहनासह यांच्यासह ८8 लाख ९१ हजार ३७५ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी सतीश शिंदे, नंदु मेमाणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘या’ पावडरपासून बनवले जात होते दूध

सदर ठिकाणी स्कीम मिल्क पावडर, व्हे परमीएट पावडर, एएचओ पोटॅशीयम हायड्रॉक्साईड, तेल आणि पाणी हे मिक्स करुन दूध बनवले जात होते. तयार करण्यात आलेले दूध व सर्व साहित्याचे नमुने अन्न भेसळ प्रतिबंधक विभागाचे सहाय्यक आयुक्त सय्यद इम्रान हाश्मी यांनी घेतले असून ते आता तपासणीला पाठवले जाणार आहेत.

अधिक वाचा :

Back to top button