

गंगापूर, पुढारी वृत्तसेवा : लोककलेसाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे लोकशाहीर मनोहर किसनराव जाधव (वय ९०) यांचे बुधवार (दि.१६) वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना मराठवाडा भूषण पुरस्कार मिळाला होता. त्यांच्या पश्चात चार मुले, एक मुलगी, सुना नातवंडे, असा परिवार आहे.
शाहीर मनोहर जाधव यांनी बिकट आर्थिक परिस्थितीवर मात करीत पाचवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. अंगी असलेली लोककला शालेय कार्यक्रमातून प्रदर्शित करीत जाधव यांनी आपल्या लोककलेला प्रारंभ केला. लोकांची वाहवा अन् अपेक्षित बिदागी यामुळे लोककलाच आपले जीवन आणि मरण असा निश्चय करीत जाधव यांनी आपला कलाप्रवास सुरूच ठेवला. आंबेडकरी प्रतिभेचे महाकवी वामनदादा कर्डक यांच्याशी त्यांचा परिचय झाल्यानंतर खर्या अर्थाने जाधव यांच्या कलाकक्षा विकसित झाल्या. वामनदादा कर्डकांच्या कवितांचा प्रभाव जाधव यांच्या शाहिरीवर होत गेला आणि त्यातूनच मग शेकडो बुद्ध-भीमगीते, राष्ट्रीय गीते, शेतकरी गीते, अशा साहित्यकृती निर्माण होत गेल्या.
दत्तोबा तांबे, साळी शिरोलीकर, चंद्रकांत ढवळपुरीकर, दत्ताराम महाडिक पुणेकर आदि तमाशा मंडळांमध्ये भक्त पुंडलिक, सावता म्हणे केला मळा, ज्ञानेश्वर माझी माऊली, करतो चोखोबा जोहार, ती दिल्ली हातातून गेली, लाग्नाधी कुंकू पुसले, मुंबईचा हमाल अशा विविध नाटकांमध्ये भूमिका सकारल्या. त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील सरस्वती भवन महाविद्यालयात स्वातंत्र्यसेनानी विजयन्द्रजी काब्रा, विकास जैन, बसये बंधु यांच्या हस्ते मराठवाडा भूषण पुरस्कार प्राप्त झाला होता. त्यांनी गंगाधर मनोहर तमाशा मंडळ पार्टी निर्माण करून गावोगावी मनोरंजनातून समाजप्रबोधन केले.