समृद्धी महामार्ग : टायर फुटलेल्या ट्रकवर भरधाव ट्रक आदळून भीषण अपघात दोनजण जागीच ठार

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : तीन दिवसांपूर्वीच छत्रपती संभाजीनगरच्या सहा जणांचा बळी घेणाऱ्या समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरुच आहे. बुधवारी (दि. १५) पहाटे साडेसहा वाजता रहाळपट्टी तांडा, जटवाडा परिसरात आणखी एका अपघातात दोन जण ठार तर एकजण जखमी झाला. टायर फुटल्याने शेवटच्या लेनवर उभ्या असलेल्या ट्रकवर पाठीमागून येणारा भरधाव ट्रक आदळल्यामुळे हा अपघात झाला.
हा अपघात एवढा भीषण होता की,पाठीमागील ट्रकच्या केबिनचा अक्षरश: चुराडा झाला, अशी माहिती हर्सूल ठाण्याचे निरीक्षक अमोल देवकर यांनी दिली. नीरज रामजी पांडे (22, रा. साराय महाजोगावाडा, प्रतापगड, उत्तरप्रदेश) आणि मोहंमद नसरुद्दीन अजिमुद्दीन (वय 28, रा. बिरमाप, जि. रायपूर, छत्तीसगड) अशी अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. तर विनोद विश्वनाथ मिश्रा (22, रा. उत्तर प्रदेश) असे जखमीचे नाव आहे.
अधिक माहितीनुसार, कांद्याने भरलेला ट्रक (यूपी 70, जीटी 7590) माळीवाड्याकडून सावंगीच्या दिशेने जात होता. जटवाडा परिसरातील रहाळपट्टी तांडा शिवारात त्यांच्या ट्रकचे टायर फुटल्याने त्यांनी शेवटच्या लेनवर ट्रक उभा केला होता. दरम्यान, परफ्यूमच्या कच्च्या मालाचा दुसरा ट्रक (क्र. सीजी 04, एलटी 7051) सावंगीच्या दिशेने येत होता. रहाळपट्टी तांडा शिवारात या ट्रकच्या चालकाला समोर उभा असलेला कांद्याचा ट्रक दिसला नाही. त्यामुळे भरधाव ट्रक कांद्याच्या ट्रकवर पाठीमागून धडकला. ही धडक एवढी भीषण होती ट्रकच्या केबिनचा पूर्णत: चुराडा झाला. त्यात असलेले नीरज पांडे, विनोद मिश्रा आणि मोहंमद नसरुद्दीन हे तिघेही गंभीर जखमी झाले. पांडे आणि नसरुद्दीनचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मिश्रावर उपचार सुरु आहेत. क्रेनच्या मदतीने दोन्ही ट्रक वेगवेगळे करावे लागले. उपनिरीक्षक पूनम अतुल पाटील यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. या अपघाताची नोंद हर्सूल ठाण्यात करण्यात आली.
हेही वाचंलत का?
- Ram Mandir : राम मंदिराचे काम वेगात सुरू : अयोध्या राम मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंद महाराज
- Maharashtra Political Crisis : राजकीयदृष्ट्या सुसंस्कृत महाराष्ट्राला कलंक लागतोय : घटनापीठ
- ICC Rankings Virat Kohli: विराटची आयसीसी टेस्ट क्रमवारीत झेप, गोलंदाजीत अश्विन अव्वल स्थानी कायम