व्यावसायिक बाजारात हरवतोय भारतीय सिनेमा | पुढारी

व्यावसायिक बाजारात हरवतोय भारतीय सिनेमा

छत्रपती संभाजीनगर; राहुल जांगडे :  एक चित्रपट संपूर्ण जगावर प्रभाव पाडू शकतो. अव्यक्त गोष्ट व्यक्त करणारे शक्तिशाली माध्यम म्हणजे सिनेमा. एक सिनेमा संपूर्ण जगावर प्रभाव पाडू शकतो. मात्र, भारतात बहुतांशी मनोरंजनाचे साधन म्हणून बघितले गेल्यामुळे सिनेमा बाजारातील वस्तू बनली आहे. कोट्यवधी कमाईचे आकडे फुगत अस तरी अभिजात कलेकडे सिनेमाची वाटचाल मंदावल्याचे मत सिनेदिग्दर्शक तथा एमजीएम स्कूल ऑफ फिल्म आर्टचे संचालक शिव कदम यांनी व्यक्त केले. या क्षेत्रामध्ये काम करणं गरजेचं झाले आहे. असेही त्यांनी नमूद केले.

आजचा काळ हा थ्री डी इफेक्ट सिनेमांचा असून, ज्यात प्रेक्षक स्वतः एक भाग होऊन सिनेमा अनुभवू शकतो. मात्र, देशातील पहिला बोलपट ते आजचा बिग बजेट आणि मल्टी इफेक्ट सिनेमा हा प्रवास कसा झाला असेल, हे जाणून घेण्याची प्रत्येकाची उत्सुकता असल्याने दैनिक ‘पुढारी’ने सृजनशील दिग्दर्शक शिव कदम यांच्याशी संवाद साधला.

पहिला बोलपट आलम आरा ते आतापर्यंतच्या चित्रपटाच्या प्रवासात अनेक टप्पे, वेगवेगळी स्थियंततरे आल्याचे शिव कदम म्हणाले. बोलपटांपूर्वी मूकपटात जेव्हा एखाद्या दृश्यात बोलल्याशिवाय पर्याय नसायचा. तेव्हा खरी अडचण व्हायची. मग तिथे स्ट्रीप आणि प्लेटसचा वापर सुरू झाला. पहिला बोलपट आला तेव्हा सुरुवातीला जेवढं बोलणं गरजेचे आहे. तेवढ्यापुरता त्याचा बोलपट म्हणून त्याचा वापर व्हायला लागला. पुढे मग कादंबरी, कथा प्रमाणे चित्रपट सांगता येईल का, नाटकासारखं संवादाचे माध्यम सिनेमात आणता येईल का, अशा पद्धतीचे काही प्रयोग झाले.

१९४० च्या दशकात जर्मन अभिव्यक्तिवाद आणि फ्रेंच न्यू वेव यामुळे सिनेमाची परिमाणे बदलली. त्यानंतर चित्रपटात राज- राजवाडे, देव यांच्यापेक्षा सामान्य लोकांची गोष्ट, खरं सत्य सांगणारा नवं वास्तववाद आला आणि सिनेमा खऱ्या अर्थाने समृद्ध होण्यास सुरुवात झाली. भारतीय सिनेमामध्ये निचानगर, पांधेर पांचाली हे चित्रपट महत्त्वाचा टप्पा ठरले. पुढे प्रगत तंत्रज्ञानासोबत आयोजन, फिल्म सोसायटी चळवळ सिनेमाला मोठे स्वरूप प्राप्त होत गेले, हे आमूलाग्र बदलही कदम यांनी विशद केले.

प्रेक्षकांना नाच आवडतो

व्यावसायिक महत्त्वाकांक्षेने भारतीय सिनेमाला ग्रासले आहे. प्रेक्षकांना नाच आवडतो, गाणी आवडतात म्हणून हा सगळा मसाला टाकला जातो. मुळात सिनेमा गंभीरतेने परिणाम करू शकतो, हा विचारच मागे पडत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. सृजनशील, वास्तववादी
सिनेमा बनवणे, फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन, फिल्म सोसायटी चळवळ व्यापक होण्याची गरज असल्याचा उल्लेख कदम यांनी केला.

Back to top button