नवीन पाणी योजनेचा रोडमॅप सादर करा : हायकोर्ट | पुढारी

नवीन पाणी योजनेचा रोडमॅप सादर करा : हायकोर्ट

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जायकवाडी धरणातून छत्रपती संभाजीनगर शहरास मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी कामांवर मंजूर नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम अतिशय संथ गतीने सुरू असून, संपूर्ण प्रकल्पाचा नियोजित कालावधी ३१ मार्च २०२४ पर्यंत प्रकल्प पूर्णत्वासाठीचा टप्प्यानुसार रोडमॅप ३१ मार्च २०२३ ला सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे आणि न्या. संजय देशमुख यांनी दिले.

या योजनेसाठी महापालिकेला राज्य शासनाकडून प्राप्त झालेले २८९ कोटी रुपये या योजनेव्यतिरिक्त इतर कोणत्याही कामासाठी न वापरण्याचे निर्देशही खंडपीठाने महापालिकेला दिले. नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामाबद्दल दाखल जनहित याचिकेवर सोमवारी (दि. १३) झालेल्या सुनावणीत खंडपीठ नियुक्त विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या वतीने अॅड. सचिन देशमुख यांनी माहिती दिली, की जायकवाडीपासून शहरापर्यंतचे ३९ कि.मी. पाइपलाइनचे काम हाती घेण्यात आले असून, गेल्या दोन वर्षांत यापैकी फक्त ५ कि.मी. लांबीची पाइपलाइन टाकून झाली आहे. नियोजित काम झालेले काम आणि कामाची गती अतिशय संथ आहे. याशिवाय शहरासाठी ३१ मार्चपर्यंत ७ जलकुंभ आणि ३१ एप्रिलपर्यंत अजून ३ जलकुंभ तयार करून देण्याची हमीही देण्यात आली आहे.

१९११ पैकी २६ कि.मी. वितरिका पूर्ण

शहरात टाकावयाच्या १९११ कि. मी. वितरिकांपैकी फक्त २६ किलोमीटर काम झाले असून, संपूर्ण प्रकल्पाचे काम मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे निविदेतच मान्य करण्यात आले आहे. मूळ याचिकाकर्ता अॅड. अमित मुखेडकर, खंडपीठ नियुक्त समितीतर्फे अॅड. सचिन देशमुख, महापालिकेतर्फे अॅड. संभाजी टोपे, कंत्राटदार कंपनीतर्फे अॅड. संकेत सूर्यवंशी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे अॅड. विनोद पाटील यांनी काम पाहिले.

Back to top button