दहावीच्या पेपरला न जाऊ देता लावला बालविवाह; नवरदेवासह दोनशे वऱ्हाडींवर गुन्हा दाखल | पुढारी

दहावीच्या पेपरला न जाऊ देता लावला बालविवाह; नवरदेवासह दोनशे वऱ्हाडींवर गुन्हा दाखल

परळी, पुढारी वृत्तसेवा : दहावीची परीक्षा देणाऱ्या एका विद्यार्थिनीला गणिताच्या पेपरला जाण्यापासून रोखत तिचा बालविवाह लावल्याचा संतापजनक प्रकार परळी तालुक्यातील नंदागौळ येथे सोमवारी घडला. या प्रकरणी नवरदेवासह दोनशे वऱ्हाडींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोपनवाडी (ता. अंबाजोगाई) येथील १६ वर्षीय मुलगी व नंदागौळ येथील २४ वर्षीय मुलगा यांचा विवाह ठरला होता. सोमवार (दि. १३) रोजी हा विवाह होत असल्याची माहिती चाईल्ड हेल्प लाईन बीड यांच्याकडून ग्रामसेवकास देण्यात आली. त्यानंतर ग्रामसेवक ज्ञानेश्वर शामराव मुकाडे हे नंदागौळ येथे गेले, परंतु त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते घटनास्थळी पोहचण्यापूर्वीच हा विवाह पार पडला होता. मुलगी अल्पवयीन असल्यामुळ नंदागौळ येथे गेलो. तेव्हा तेथे लग्न समारंभ पार पडलेला होता. याप्रकरणी ग्रामसेवक ज्ञानेश्वर मुकाडे यांच्या फिर्यादीवरून नवरदेव, आई वडील, मामा, नातेवाईक, मंडप, ध्वनिक्षेपक यंत्रणा पुरवठादार, पुरोहित, फोटोग्राफर, आचाऱ्यांसह दोनशे वऱ्हाडींवर ग्रामीण ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी, एसपींनी घेतली दखल

बीड येथील सामाजिक कार्यकर्ते तत्वशील कांबळे यांनी एका अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याबाबतची माहिती दिली होती. परंतु ग्रामसेवक वेळेत न पोहचल्याने हा विवाह पार पडला. यानंतर जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे व पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकुर यांनी या गंभीर प्रकाराची दखल घेत तातडीने कारवाईच्या सूचना केल्याने नवरदेवासह वऱ्हाडी मंडळींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

ग्रामसेवक, आशा कर्मचाऱ्यांनी घ्यावा पुढाकार

गावात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची माहिती ग्रामसेवक, आशा, अंगणवाडी कार्यकर्त्यांना असते. बालविवाह रोखण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. याकरिता प्रशासनाने पुढाकार घेत याबाबतच्या सूचना संबंधितांना •दिल्यास जिल्ह्यातील बालविवाहाचे प्रकार रोखता येऊ शकतील.

Back to top button