जायकवाडीच्या सौरऊर्जा प्रकल्पास मंजुरी | पुढारी

जायकवाडीच्या सौरऊर्जा प्रकल्पास मंजुरी

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :  जायकवाडी धरणावरील तरंगते सौरऊर्जा पॅनल प्रकल्प, छत्रपती संभाजीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ धावपट्टी विस्तारकरण, घृष्णेश्वर मंदिर आणि संत ज्ञानेश्वर उद्यान विकास यासह जिल्ह्यातील विविध कामांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अर्थसंकल्पात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच विकास कामे वर्षभरात मार्गी लागणार आहे. मराठवाड्याचा तारणहार असलेल्या जायकवाडी धरणातून दरवर्षी बाष्पीभवनामुळे मोठ्याप्रमाणात पाण्याची वाफ होते. या पाण्यावर सौरऊर्जाचे पॅनल टाकल्यास होणारे बाष्पीभवन थांबेल आणि वीज निर्मिती देखील होईल, असा प्रस्ताव केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी राज्य शासनाला सादर केला होता. त्यावर अखेर गुरुवारी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी या प्रस्तावाला मंजुरी देत निधीदेखील राखीव ठेवला आहे. त्यामुळे लवकरच धरणाच्या पाण्यावर
सौरऊर्जा पॅनल टाकून वीज निर्मिती केली जाणार आहे. याशिवाय दोन वर्षांपासून रखडलेले घृष्णेश्वर मंदिर विकास प्रकल्पाच्या कामांचा देखील अर्थसंकल्पात समावेश करून त्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. यात सभामंडप विकास, पार्किंग, भोजनगृह, भक्तनिवास आणि वळण रस्त्यासाठी १५८ कोटींची तरतूद केली आहे.

विमानतळ विस्तारकरणाचा मार्ग मोकळा

छत्रपती संभाजीनगर विमानतळाच्याधावपट्टी विस्तरीकरणाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. गुरुवारी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विस्तारीकरणाच्या भूसंपासदनसाठी ७४० कोटींचा निधी मंजूर केला आहे. अर्थसंकल्पात त्याची तरतूददेखील केली आहे. त्यानुसार मार्चपूर्वी हे भूसंपादन करावे लागणार आहे. त्यानंतर केल्यास वाढीव निधी लागण्याची शक्यता आहे.

Back to top button