हिंगोली : टोकाई साखर कारखान्याची चौकशी होणार : राजू नवघरे यांच्या प्रश्नावर सहकारमंत्र्यांची घोषणा | पुढारी

हिंगोली : टोकाई साखर कारखान्याची चौकशी होणार : राजू नवघरे यांच्या प्रश्नावर सहकारमंत्र्यांची घोषणा

वसमत: पुढारी वृत्तसेवा : चालू हंगामातील २३.०३ कोटींचे थकीत उसाचे बिल देणे शक्य नसल्याचे पत्र टोकाई कारखान्याने साखर आयुक्तांना पाठविल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीला वसमत विधानसभेचे आमदार राजू नवघरे धावून आले. आज (दि.१०) त्यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित करुन शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी लावून धरल्याने या बाबत चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे सहकार मंत्र्यांनी सभागृहात जाहीर केले.

तालुक्यातील टोकाई सहकारी साखर कारखान्याचे चालू गाळप हंगाम जानेवारी, फेब्रुवारीचे ऊस बिल रक्कम व ऊस तोडणी वाहतूक बिले २३.०३ कोटी एवढे थकीत आहे.थकीत ऊसाचे बिल देणे शक्य नाही, असे पत्र कारखान्याच्या अध्यक्षांनी साखर आयुक्त (पुणे) यांना देताच ऊस उत्पादक शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. उसाचे बिल वेळेवर मिळाले नाही, तर आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. आमदार नवघरे यांनी शेतकऱ्यांच्या थकीत बिलाबाबत सभागृहात प्रश्न उपस्थित केला.

शेतकऱ्यांनी घाम गाळून कारखान्याला ऊस दिला, परंतु कारखान्याने त्यांचा मोबदला दिला नाही. तसेच कारखाना प्रशासनाने बगॅस, मोलासेस खुल्या बाजारात विकला आहे. आदी प्रकरणाची सखोल चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली.

मराठवाड्यात सहकार कारखानदारीची उज्ज्वल परंपरा आहे. नांदेड भागात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, हिंगोली भागात माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर हे उत्तम प्रकारे साखर कारखाने चालवत आहेत. आमदार नवघरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना सहकार मंत्री अतुल सावे यांनी याबाबत चौकशी करून काही आढळल्यास त्या कारखान्याविरुद्ध कारवाई करण्याची ग्वाही दिली. आता सरकार काय निर्णय घेते, याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

हेही वाचा 

Back to top button