जालना : ‘उज्ज्वला’च्या घरातून निघतो ‘चुलीचा धुराळा’ ! | पुढारी

जालना : 'उज्ज्वला'च्या घरातून निघतो 'चुलीचा धुराळा' !

भोकरदन, पुढारी वृत्तसेवा :  सर्वत्र महागाईचा भडका उडाल्याने सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. महागाईचे चटके बसत असताना आता गॅस सिलिंडरच्या दरात आणखी पन्नास रुपयांची वाढ झाल्याने महिलांचे बजेट कोलमडले आहे. परिणामी गॅस परवडत नसल्याने ग्रामीण भागात ज्यांच्याकडे उज्ज्वला आहे त्या घरातून स्वयंपाकासाठी वापरण्यात येणाऱ्या सरपणाचा धूर निघत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. मागील दोन वर्षांत गॅस सिलिंडरचे भाव दुपटीने वाढले असून शासनाने अनुदानही बंद केले आहे. पूर्वी १४.२ किलोग्रॅम गॅस सिलिंडरला १०६३.५० रुपये मोजावे लागत. आता त्यात ५० रुपयांची दरवाढ होऊन आता त्याच सिलिंडरला १११३.५० रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे महिलांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

ग्रामीण भागातील कुटुंबानी गॅस सिलिंडरऐवजी चुलीला पसंती देत झालेली उन्हात सरपण गोळा करणे सुरू झाले आहे. १ मे २०२० पासून गॅस सबसिडी बंद करण्यात आली आहे. केवळ ९,१० रुपये एवढी नाममात्र सबसिडी दिली जात आहे. दोन वर्षांपासून अनुदानच बंद करण्यात आले असल्याने सबसिडी विचारणा करण्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या गोरगरिबांना गॅस सबसिडी पुन्हा मिळावी, अशी मागणी होत आहे. सध्या गॅस सिलिंडरचे भाव गगनाला भिडल्यामुळे भोकरदन तालुक्यातील गृहिणी चुलीकडे वळल्याचे दिसत आहे.

मजुरी करून घरी परतणाऱ्या महिलांच्या डोक्यावर लाकडाचा भारा दिसून येत आहे. तर चुलीवर स्वयंपाक करून महिलांच्या डोळ्यात धूर जाऊन डोळयातून पाणी येत असते तर अनेक महिलांच्या डोळयांना त्रास वाढू लागला आहे. केंद्र सरकारने उज्ज्वला गॅस योजनेने महिलांना गॅस वापरण्याची सवय लावली. परंतु महागाईमुळे चुलीवर स्वयंपाक करणे अवघड जात आहे. शासनाने गॅसचे दर कमी करण्याची मागणी होत आहे.

Back to top button