जायकवाडीला बाष्पीभवनाचा फटका | पुढारी

जायकवाडीला बाष्पीभवनाचा फटका

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून उन्हाच्या तीव्रतेत वाढ झाली आहे. त्यामुळे कमाल तापमान ३६ अंशांवर पोहोचले असून त्याचा फटका आता लघु, मध्यम आणि मोठ्या प्रकल्पांतील जलसाठ्यांवर होण्यास सुरुवात झाली आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यातच जायकवाडी धरणातून दररोज १.३ दशलक्ष घनमीटर पाणी बाष्पीभवनामुळे कमी होत आहे. शहरातील उद्योग आणि पिण्यासाठी दररोज लागणाऱ्या पाण्यापेक्षा हे प्रमाण चार पट अधिक असल्याची माहिती धरण प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

मराठवाड्याचा तारणहार असलेले जायकवाडी धरण सलग चार वर्षांपासून ओव्हरफ्लो होत आहे. यंदा तर तब्बल अडीच महिने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू होता. सुमारे दोन वेळा जायकवाड भरेल एवढ्या पाण्याचा विसर्ग केला गेला. मात्र, असे असतानाही चार महिन्यांतच धरणाचा जलसाठा ७५ टक्क्यांवर आला आहे. त्यात फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून उन्हाची तीव्रता वाढली आहे… मार्चच्या पहिल्या आठवड्यातच कमाल आणि किमान तापमानही वाढल्याने त्याचा परिणाम धरणांच्या जलसाठ्यावर होण्यास सुरुवात झाली आहे. जायकवाडी धरणाच्या जलसाठ्यावर त्याचा मोठा परिणाम जाणवत आहे. उन्हामुळे होणाच्या बाष्पीभवनाने जायकवाडी धरणातून दररोज १.३ दलघमी पाण्याची वाफ होत आहे. उन्हाळ्याच्या प्रारंभीच ही परिस्थिती निर्माण झाल्याने एप्रिल, मे महिन्यातील कडक उन्हाळ्यात हे प्रमाण अधिकच वाढेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

६ दिवसांत ८.३९ दलघमीची घट जायकवाडी धरणातून शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. त्यासोबतच जिल्ह्यातील उद्योगांनादेखील यातूनच दररोज पाणीपुरवठा केला जातो, परंतु या सर्वांसाठी दररोज धरणातून ०.२९ दशलक्ष घनमीटर एवढेच पाणी लागते. त्यापेक्षा चार पट अधिक म्हणजेच १.३९ दलघमी पाण्याचे सध्या जायकवाडी धरणातून बाष्पीभवन होत आहे… मागील सहा दिवसांत धरणातून ८.३४ दलघमी पाणी बाष्पीभवनाने कमी झाले आहे. म्हणजेच दोन आठवडे शहराच्या उद्योग आणि पिण्याची तहान भागवेल एवढ्या पाण्याची सहा दिवसांत वाफ झाली आहे.

Back to top button