जालना : मोती तलावातील माशांच्या मृत्युने प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर | पुढारी

जालना : मोती तलावातील माशांच्या मृत्युने प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर

जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना शहरातील मोती तलावात शुक्रवारपासून मासे अचानक मरण्यास सुरुवात झाली असून शनिवारीही तलावातील पाण्यासह काठावर माशांचा खच पडलेला दिसून आला होता. दरम्यान शनिवारी पालिका प्रशासनाच्या वतीने दिवसभर तलावातील मृत मासे काढण्याची मोहीम राबविण्यात आली. मात्र तलावातून काढण्यात आलेले मासे गांधीनगर व उड्डाण पुलाच्या खाली मोकळ्या जागेवर टाकण्यात आल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहीला आहे.

शहरातील विरंगुळ्याचे ठिकाण म्हणून मोती तलावाकडे पाहीले जाते. दररोज सकाळी मॉर्निंग वॉकसाठी शेकडो नागरिक तलाव परिसरात येतात. सायंकाळीही येथील तलावाच्या काठावर असलेल्या चौपाटीवर नागरिकांची गर्दी होते. युवक व युवतींसाठी तलाव परिसर सेल्फी स्पॉट म्हणून ओळखला जातो. येथील तलावात मोठ्या प्रमाणावर मासे असल्याने तलावात पानकोंबड्यांसह इतर पक्ष्यांचीही गर्दी असते. अनेक पाहुणे पक्षीही तलाव परिसरात पक्षी अभ्यासकांना खेचून आणतात. मात्र गेल्या तीन दिवसांपासून मोती तलावातील मासे मरत असल्याने परिसरात दुर्गधी पसरू लागली आहे. जिल्हा व पालिका प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आगामी काही दिवसात प्रदूषित पाण्यातील तसेच मेलेले मासे खाल्ल्याने पक्ष्यांचे आरोग्यही धोक्यात येणार आहे.

Back to top button