वाशिमचे नामांतर वत्सगुल्म करा, मुख्यमंत्र्यांकडे मागणी | पुढारी

वाशिमचे नामांतर वत्सगुल्म करा, मुख्यमंत्र्यांकडे मागणी

वाशीम :पुढारी वृत्तसेवा – वाशिम शहराचे नाव प्राचीन काळापासून वत्सगुल्म होते. पद्मपुराणात तसा उल्लेखही आहे. वत्सगुल्म हा शब्द वत्स आणि गुल्म या दोन शब्दांची संधी आहे. जवळच निजामशाही असल्यामुळे उर्दूमिश्रित शब्दांचा प्रभाव या ही परगण्यात झाला. त्यामुळे वत्स या शब्दाचा वच्छ आणि गुल्म शब्दाचा उम असा अपभ्रंश झाला. त्यापासून वच्छोम,वाच्छिम आणि वाशिम असा शब्द तयार झाला. आता वाशिमचे नाव वत्सगुल्म व्हावे यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळापासून मागणी आहे.

१९०२ ला वाशिम जिल्हा होता त्यावेळी या मागणीला सुरुवात झाली.१९१८ साली लोकमान्य टिळक वाशिमला आले होते त्यावेळी देखील याबाबत चर्चा झाल्याचे सर्वश्रृत आहे.१९३६ मध्ये स्वातंत्रवीर सावरकर वाशिमला आले तेव्हाही याबाबत सभेतून उल्लेख झाला. पद्मतीर्थ सरोवराची केस प्रिव्ही काउन्सिल लंडन येथे लढताना देखील वत्सगुल्म हे नाव वारंवार वापरले गेले. साधारणतः १९९९- २००० च्या दरम्यान या मागणीने जोर धरला होता. त्यामुळे वाशिमचे नाव वत्सगुल्म व्हावे ही मागणी खूप जुनी आहे.

अनेक वर्ष वाशिम शहरात वत्सगुल्म (वाशिम)असे दुहेरी नाव वापरा असे फलक झळकत होते. विद्यमान शासनाने नुकतेच संभाजीनगर आणि धाराशिव ही नामांतरे केल्यामुळे वाशिमकरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

विद्यमान शासनाची अनुकूलता लक्षात घेवून आज दिनांक २/३/२०२३ गुरुवार रोजी वत्सगुल्म नामांतर जनजागरण मंच वत्सगुल्म वाशिम यांच्या वतीने वाशिमकरांनी जिल्हाधिकारी वाशिम यांच्यामार्फत मुख्यमंत्री महोदयांना निवेदन देण्यात आले.

निवेदन देताना प्रा. दिलीप जोशी, माजी आमदार पुरुषोत्तम राजगुरू, व्यापारी मंडळाचे जुगलकिशोर कोठारी, शिवसेना शहर प्रमुख श्याम दुरतकर, वसंतराव धाडवे, मधुसुदन काकानी, बंटी शेठी, यश काष्टे, राजू कलवार, रामभाऊ ठेंगडे फौजी, मनोज जैस्वाल, सौ. छायाताई पवार, सौ. वृषाली टेकाले, कु.प्रांजल काकानी, शिवाणी गोगे, अजय ढवळे, पंकज गाडेकर, सुनील देशमुख, आतिषसिंह कश्यप, जयपाल साबळे यांच्यासह वाशिमकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button