बीड – जनावरांचे बाजार बंद असल्याने मजुरांना बैल विक्रीसाठी फटका? | पुढारी

बीड - जनावरांचे बाजार बंद असल्याने मजुरांना बैल विक्रीसाठी फटका?

नेकनूर (जि. बीड) – मनोज गव्हाणे – लंपीच्या प्रादुर्भावाने जनावरांचे आठवडी बाजार बंद करून चार महिने लोटले आहेत. यामुळे आठवडी बाजारांना मोठा फटका बसला. ऊसतोड मजूर परतल्यानंतर बैलजोडी सांभाळणे अवघड असल्याने त्यांना बाजाराचा रस्ता दाखवला जातो. मात्र बाजार सुरू नसल्याने ते विकायचे कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. जनावरांचे बाजार सुरू करण्याची मागणी आमदार नमिता मुंदडा यांनी मुख्यमंत्र्याकडे गत आठवड्यात पत्राद्वारे केली आहे.

जिल्ह्यातील जनावरांचे बाजार असलेले नेकनूर, हिरापूर, साळेगाव या बाजारांच्या ठिकाणांना मागच्या चार महिन्यात लंपीच्या प्रादुर्भावाने मोठा फटका बसला. जनावरांची खरेदी-विक्री बंद असल्याने लाखोंचे व्यवहार ठप्प झाले होते. याचबरोबर इतर व्यवसायांना याचा फटका बसला. लंपी कमी झाल्याने जनावरांचे बाजार सुरू करण्याची मागणी शेतकरी व व्यापारी यांनी केलीय. आ. नमिता मुंदडा यांनी आठवाडी बाजार सुरू करण्यासाठी मुख्यमंत्र्याकडे पत्राद्वारे मागणी केली. मात्र, पंधरा दिवसाचा कालावधी होऊनही यासंबंधीचा आदेश निघालेला नाही. त्यातच गत आठवड्यापासून पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटककडे ऊस तोडणीसाठी गेलेले मजूर परतू लागले आहेत.

बैल जोड्या परतल्यानंतर पाणी, चारा नसणे आधी कारणांमुळे बाजारात विकण्याशिवाय या मुजराकडे पर्याय नसतो. मोबाईल संपर्कातून अनेकांना अपेक्षित भावापेक्षा ते कमी किमतीत विकण्याची वेळ आली असल्याने लवकरात लवकर आठवडी बाजार सुरू करण्याची मागणी होत आहे.

ऊस तोडणीचे काम संपल्याने आता मोठ्या बैलांना सांभाळणे अवघड आहे. शेतात चारा नाही. विकत घेऊन तो परवडत नाही. यामुळे विकणे हाच पर्याय आहे. मात्र बाजार बंद असल्याने ते विकायचे कुठे हा प्रश्न असून यामुळे इतरत्र बैल जोडीला योग्य किंमत मिळनार नाही. – जगन्नाथ मुंडे, निवडुंगवाडी.

Back to top button