प्रेम प्रकरणातून दहावीच्या मुलाचा हात तोडून खून? | पुढारी

प्रेम प्रकरणातून दहावीच्या मुलाचा हात तोडून खून?

वैजापूर, पुढारी वृत्तसेवा : चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या दहावीतील मुलाचा मृतदेह २८ फेब्रुवारीला भिवगाव (ता. वैजापूर) शिवारात आढळला. तो वर्गमैत्रिणीला बोलायचा. तसेच, त्याने तिला मोबाइल दिला होता. त्यांच्या प्रेमप्रकरणातूनच त्याची हात तोडून निघृण हत्या केल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, वैजापूर पोलिसांनी मुलीचे आई- वडील, काका आणि आजोबा अशा चौघांना ताब्यात घेतले आहे.

सचिन प्रभाकर काळे (वय १६, रा. विनायकनगर, बोरसर, ता. वैजापूर) असे मृताचे नाव आहे. अधिक माहितीनुसार, सचिन विनायकनगर येथील शाळेत दहावीत शिकत होता. २४ फेब्रुवारीपासून सचिन बेपत्ता होता. दोन दिवस त्याचा शोध घेतला, मात्र त्याचा शोध लागला नव्हता. सोमवारी त्याच्या वडिलांनी वैजापूर ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. मात्र, मंगळवारी तालुक्यातील भिवगाव शिवारातील गट क्रमांक २३१ मध्ये भास्कर माधव गायके यांच्या शेतात कुजलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. पोलिस उपाधीक्षक महक स्वामी यांच्यासह फौजदार मनोज पाटील, मोईस बेग, राम कवडे आदींनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृतदेह कुजलेला असल्याने जागेवरच शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, बोरसर प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय पथकाने शवविच्छेदन करून सचिनचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिला.

समजही दिली होती

भिवगाव येथील एक मुलगी सचिनच्या वर्गात शिकते. वर्गमित्र असल्याने ते दोघे बोलायचे. त्यांच्यात प्रेमप्रकरण आहे असा संशय मुलीच्या कुटुंबीयांना होता. त्यामुळे तिच्यापासून दूर राहण्याची समजही त्यांनी सचिनला दिली होती. दरम्यान, २४ फेब्रुव- रीला संध्याकाळी सचिनने घरी बहिणींसोबत अभ्यास केला. ते सर्वजण झोपी गेल्यावर सचिन त्या मुलीला भेटायला गेला. त्यानंतर तो परतलाच नाही.. तो शनिवारपासून बेपत्ता होता. सचिन त्या मुलीला भेटायला गेल्याची भनक तिच्या कुटुंबीयांना लागल्यावर त्यांनी सचिनला संपविले असावे, असे सांगितले जाते. आरोपींनी सचिनचा हात तोडल्याचे शवविच्छेदनातून समोर आले. त्या मुलीच्या घरापासून काही अंतरावरच त्याचा मृतदेह आढळला आहे.

Back to top button