परभणी : शिक्षकांनीच मोबाईलवर व्हायरल केली प्रश्नपत्रिका; ६ शिक्षकांवर गुन्हा दाखल | पुढारी

परभणी : शिक्षकांनीच मोबाईलवर व्हायरल केली प्रश्नपत्रिका; ६ शिक्षकांवर गुन्हा दाखल

सोनपेठ; पुढारी वृत्तसेवा बारावीच्या परीक्षेत शिक्षकांनीच मोबाईलवर प्रश्नपत्रिका व्हायरल केली असल्‍याचं समोर आलं आहे. काल (मंगळवार) दि.21 रोजी सुरू झालेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेस सोनपेठ तालुक्यातील शिक्षकांकडूनचं गालबोट लागले. कॉपीमुक्त परीक्षेचा बट्ट्याबोळ सोनपेठच्या खुद्द शिक्षकांनी केला असल्‍याचं प्रकरण समोर आले आहे.

एकीकडे ज्ञानर्जनाची चळवळ उभी राहत असताना दुसऱ्या बाजुला दिव्याखालीच अंधार दिसून येत आहे. नियमित शिकवणी वर्ग करण्यास कुचराई करणाऱ्या शिक्षकांकडून विद्यार्थी नापास झाल्यास आपल्या संस्थेच्या यशास अडथळा येईल आणि गुणवत्ता ढासळल्यास विद्यार्थी संख्या कमी होईल या भीतीने सोनपेठच्या महालिंगेश्वर शाळेच्या पाच शिक्षकांसह एका खाजगी संस्थेच्या शिक्षकाने सदरच्या इंग्रजी विषयाचा पेपर मोबाईलद्वारे व्हायरल करत मोठा गैरप्रकार केल्‍याचे समोर आले आहे.

सोनपेठ पोलिसांकडून शिक्षण विभागाला अहवाल दिला असून, सदरच्या सहा शिक्षकांवर शिक्षण विभागाकडून कारवाई करण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरू होती. नियमानुसार अहवाल दिला असल्याचे मत नवनियुक्त पोलीस निरीक्षक सुनील रेंजितवाड यांनी दिला आहे. या घटनेमुळे सोनपेठमध्ये एकच खळबळ उडाली असून, कॉप्या पुरवणारे साहित्यही सदरच्या शिक्षकांच्या घरून जप्त करण्यात आले आहे. दरम्यान रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु होती.

अखेर त्‍या शिक्षकांवर गुन्हा दाखल

परभणीच्या सोनपेठ शहरालगत असलेल्या महालिंगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात बारावीचा इंग्रजीचा पेपर अकरा वाजता देण्यात आला. हा पेपर देताच दोन शिक्षकांनी त्याचा फोटो काढून व्हॉट्सॲपद्वारे इतर शिक्षकांना पाठवला. हे शिक्षक महाविद्यालयाच्या मागच्या बाजूला असलेल्या एका खोलीत बसून त्याची विद्यार्थ्यांसाठी कॉपी तयार करत होते. ही बाब समजताच सोनपेठ पोलीस ठाण्याच्या एका पथकाने त्यांना पकडले.

काल दिवसभर या सर्व प्रकाराची चौकशी पोलिसांनी केली. रात्री पोलिसांकडून शिक्षण विभागाला याबाबत अहवाल देण्यात आला. त्यानंतर काल रात्री उशिरा या प्रकरणातील या सहा शिक्षकांना अटक देखील करण्यात आली. ते शिक्षक पुढील प्रमाणे आहेत. कालिदास कुलकर्णी, बालाजी बुलबुले, गणेड जयतपाल, रमेश मारोती शिंदे, सिद्धार्थ सोनाळे आणि भास्कर तिरमले अशी अटक केलेल्या शिक्षकांची नावे आहेत. बारावी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात कॉपीमुक्त अभियान राबवलं जात असतानाच शिक्षकांनीच या अभियानाला हरताळ फासल्याचं समोर आलं आहे. सहा शिक्षकांवर महाराष्ट्र विद्यापीठ, मंडळाच्या व इतर विधिनिष्ठ परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकार प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम 1982 कलम 5,7,8, नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या सहाही जणांना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा : 

Back to top button