आग्य्राच्या लाल किल्ल्यात आज घुमणार ‘जय भवानी.. जय शिवाजी’चा जयजयकार | पुढारी

आग्य्राच्या लाल किल्ल्यात आज घुमणार ‘जय भवानी.. जय शिवाजी’चा जयजयकार

औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा : आग्य्रातील ऐतिहासिक लाल किल्ल्याच्या ज्या ‘दिवान-ए- आम’मध्ये मुघल बादशाहा औरंगजेबासमोर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची अस्मिता आणि स्वाभिमानाचा हुंकार जागवला होता, तोच ‘दिवान-ए-आम’ रविवारी (दि. 19) ‘जय भवानी… जय शिवाजी…’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय…’ अशा जयघोषाने दुमदुमणार आहे. इतिहासात पहिल्यांदाच या किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. उदयनराजे भोसले यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

आग्य्राच्या किल्ल्यातून औरंगजेबाच्या कैदेतून सुटका हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण अध्याय आहे. शिवरायांचा स्वाभिमान आणि त्यांच्या अचाट शौयार्र्ची प्रचिती दाखविणारा तो एक अद्भूत असा प्रसंग होता. त्यामुळे आग्रा किल्ल्यातच शिवजयंती साजरी करण्याचा संकल्प औरंगाबादेतील देवगिरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी केला होता. या किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्यासाठी त्यांनी न्यायालयीन लढाईही लढली. अखेर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश सरकारच्या सहकार्यामुळे त्यांना त्यात यश आले आणि येथे शिवजयंती साजरी करण्यासाठी परवानगी मिळाली.

उद्या होणार्‍या या कार्यक्रमाला रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, महाराष्ट्राचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, शालेय शिक्षण व मराठी भाषामंत्री दीपक केसरकर, पालकमंत्री संदीपान भुमरे, उत्तर प्रदेश सरकारचे माहिती तंत्रज्ञानमंत्री योगेंद्र उपाध्यायही उपस्थित राहणार आहेत.

Back to top button