

जालना: पुढारी वृत्तसेवा : महावितरणने मागील वर्षी कृषी वीज थकबाकी वसुलीसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. त्यामुळे कृषी वीजबिल थकबाकी काही प्रमाणात वसूल झाली. मात्र, जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह घरगुती, व्यावसायिक, सार्वजनिक व औद्योगिक वीज बिलाची थकबाकी महावितरण प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांकडे पाणीपुरवठा व पथदिवे थकीत वीजबिलाचा आकडा मोठा आहे. जिल्ह्यात घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, सार्वजनिक सेवा व इतर अशा 3 लाख 66 हजार 550 वीज ग्राहकांकडे 1 हजार 974 कोटी 34 लाख रुपयांची थकबाकी आहे. ही वसुली मार्चपर्यंत वसूल करण्याचे महावितरण समोर आव्हान आहे.
जालना जिल्ह्यात महावितरणच्या थकबाकीचा आकडा गेल्या काही वर्षापासून वाढत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांकडून त्यांच्या कार्यक्षेत्रात पथदिवे लावले जातात. या पथदिव्यांमुळे शहर व ग्रामीण भागापर्यंतचे रस्ते रात्रीच्या वेळी उजळून निघत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था ही वीज महावितरणकडून घेतात. मात्र उत्पन्नापेक्षा खर्च अधिक असल्याने स्थानिक संस्थांकडे मोठ्या प्रमाणात वीजबिले थकीत आहेत. 1 हजार 823 ग्राहकांकडे पथदिव्यांच्या वीज बिलाचे 117 कोटी 32 लाख रुपयांची थकबाकी आहे.
जिल्ह्यात सर्वांत जास्त थकबाकी कृषीपंपाची आहे. कृषीपंपाच्या 1 लाख 35 हजार 692 ग्राहकांकडे 1 हजार 733 कोटी 80 लाख थकबाकी आहे. त्याखालोखाल पथदिव्याची थकबाकी आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पाणीपुरवठा योजनांच्या 1 हजार 112 ग्राहकांकडे पाणीपुरवठा योजनेचे 36 कोटी 90 लाख रुपयांचे वीजबिल थकीत आहे. 2 लाख 4 हजार 38 घरगुती ग्राहकांकडे 69 कोटी 24 लाख रुपये, 16 हजार 856 व्यावसायिक ग्राहकांकडे 6 कोटी 29 लाख, 4 हजार 742 औद्योगिक ग्राहकांकडे 7 कोटी 48 लाख तर इतर 2 हजार 287 ग्राहकांकडे 3 कोटी 20 लाख थकबाकी आहे. महावितरण कपंनीकडे मटेरीयल नसणे, रोहित्र बंद पडणे, ग्रामीण भागात पंधरा-पंधरा दिवस वीज पुरवठा खंडीत राहणे. यासारख्या विविध कारणामुळे वीज ग्राहकांना सेवा देण्यात महावितरण कमी पडत आहे. थकबाकीकडे बोट दाखवितानाच महावितरणने सेवाही सुधारणे गरजेचे आहे.
जिल्ह्यात थकबाकीचा डोंगर वाढत असल्याने महावितरणचा आर्थिक डोलारा अडचणीत सापडला आहे. दुसरीकडे महावितरण ग्राहकांना सेवा देण्यात कमी पडत असल्यानेही वसुलीवर परिणाम होत आहे. अनेक ग्राहकांच्या मीटर तपासणीत अडचणी येत आहेत.
हेही वाचा