जालना : मराठा आरक्षणासा‍ठी कार्यकर्त्यांचे उपोषण सुरुच | पुढारी

जालना : मराठा आरक्षणासा‍ठी कार्यकर्त्यांचे उपोषण सुरुच

सुखापुरी; पुढारी वृत्तसेवा: अंबड तालुक्यातील वडीकाळ्या येथे सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणासाठी सुमारे ३८ महिला, पुरुषांनी बेमुदत उपोषण सुरु केले आहे. या प्रश्‍नी तोडगा काढण्यासाठी एक शिष्टमंडळ येणार होते. मात्र अद्याप शिष्टमंडळ आले नसल्याने कार्यकर्त्यांनी उपोषण सुरुच ठेवले आहे. सात आंदोलकांची तब्येत खालावली आहे. ‘आमची माणसे मेल्यावर चर्चासाठी शिष्टमंडळ येईल का?’, असा सवाल संतप्त आंदोलक महिलांकडून राज्‍य  सरकारला करण्‍यात येत आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, जालन्याचे पालकमंत्री अतुल सावे जाणुनबुजून वडीकाळ्या गावातील मराठा आरक्षण प्रश्‍नी सुरु असणार्‍या आंदोलनाकडे पाठ फिरवत आहेत. मंत्र्यांचे एक शिष्टमंडळ मुंबईवरून चर्चेसाठी येणार होते; परंतु याबाबत सरकारने मागील तीन दिवस कोणताही निर्णय घेतलेला नाही. सरकारने लवकरात लवकर मंत्रिमंडळाचे शिष्टमंडळ पाठवून या प्रश्नी तोडगा काढावा, अशी मागणी उपोषणकर्त्यांसह ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

आज उपोषणाच्या चौथ्या दिवशी सात उपोषणकर्त्यांची तब्येत बिघडली. त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उर्वरित ३ उपोषणकर्त्यांनी आंदोलनस्थ‍ळीच उपचार घेऊ, अशी भूमिका घेतली आहे.

दोन दिवसात मराठा आरक्षणावर तोडगा निघायला हवा. कारण दिवसेंदिवस आंदोलकांची तब्येत बिघडत चालली आहे. आंदोलक मेल्यावर तुम्ही आमच्यासोबत चर्चा करून आम्हाला आरक्षण देणार का?
– मनोज जरांगे पाटील, आंदोलक

Back to top button