हिंगोली: चार वर्ष पेरूच्या झाडांना फळेच लागली नाहीत! शेतकर्यांनी फळबागा तोडून टाकल्या

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा: वसमत तालुक्यातील आंबा येथील शेतकर्यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेमध्ये घेतलेल्या पेरूच्या झाडांना चार वर्षांनंतरही फळे लागली नाहीत. पेरुच्या झाडांना साधारण पहिल्या वर्षीपासून फळे येतात. मात्र, गेली चार वर्षे वाट बघून देखील फळे येत नसल्याने, एवढी वर्षे जपलेली झाडे एका शेतकर्याने सोमवारी तोडून टाकली. यामुळे तब्बल २२ लाख रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचे संबंधित शेतकर्याने म्हटले आहे.
शेतकर्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेमध्ये शेतकर्यांना विविध योजनांचा लाभ दिला जातो. यामध्ये ठिबक, तुषार सिंचनासोबतच फळबागांना अनुदान दिले जाते. त्यानुसार वसमत तालुक्यातील आंबा येथील शेतकरी भगतराव भोसले, भारत भोसले, मनोज अंबेकर यांनी योजनेअंतर्गत येथून पेरूची रोपे घेण्याचा निर्णय घेतला. मागील चार वर्षापूर्वी त्यांनी जालना जिल्ह्यातील एका नर्सरीमधून लखनौ 49 या वाणाची पेरुची सुमारे 1700 रोपे आणली. ही रोपे साडेसहा बाय दहा या अंतरावर शेतात लावली.
दरम्यान, या रोपांची चांगली निगा केल्यानंतर पेरुची झाडे चांगलीच वाढली. पाणी, खत व्यवस्थापन करून उन्हाळ्यात या रोपांना पाणी दिले. मात्र, ४ वर्षानंतरही त्याला फळेच लागली नाहीत. त्यामुळे रोपे खराब निघाल्याचे शेतकर्यांच्या लक्षात आले. या संदर्भात त्यांनी कृषी विभागाकडे माहिती दिली. मात्र, कृषी विभागाने त्यांना काहीही मदत केली नसल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे.
पेरूची लागवड केल्यानंतर पहिल्या वर्षीपासूनच उत्पादन सुरु होते. फळेच लागली नसल्याने तीनही शेतकर्यांचे सुमारे २२ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे शेतकर्यांने म्हटले आहे. या गावात मात्र इतर वाणांच्या पेरूच्या झाडांना चांगली फळे लागल्याने व्यापार्यांनी शेतात येऊन फळे खरेदी केली. एका वर्षात २०० झाडांपासून १.५० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाल्याचे सांगण्यात आले. त्या तुलनेत लखनौ-49 या वाणाला फळेच लागली नसल्याने मोठे नुकसान सहन करावे लागले. दिवसरात्र एक करून जपलेली झाडे तोडावी लागल्याने दुःख होत असल्याचे येथील एका शेतकर्यांने सांगितले आहे.