वॉर्मिंग नव्हे, जगाचा प्रवास ग्लोबल कुलिंगकडे; उन्हाळा परवडेल पण थंडीने होईल जगणे अवघड

औरंगाबाद : संजय देशपांडे वाढते प्रदूषण, ग्रीन हाऊस इफेक्ट आणि हवामान बदलामुळे जागतिक तापमान वाढीचा (ग्लोबल वॉर्मिंग) धोका वर्तविला जात असला तरी जगाचा प्रवास ग्लोबल कुलिंग म्हणजेच जागतिक तापमान घटीच्या दिशेने सुरू असल्याचे औरंगाबाद येथील एमजीएमच्या डॉ. एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनीवास औंधकर यांच्या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.
सूर्यावरील सौरडागांच्या सातत्याने घटणाऱ्या संख्येचा परिणाम म्हणून पृथ्वीवर लवकरच छोटे हिमयुग अवतरू शकते. २०१४ पासून होणारी गारपीट व २०१८ पासून हिवाळ्यातील कडाक्याची थंडी याचीच चाहूल असल्याचा दावा औंधकर यांनी केला आहे. अंतराळ संशोधक औंधकर हे गेल्या १५ वर्षांपासून सौरडागांचा अभ्यास करीत आहेत. त्यातूनच पृथ्वीची वाटचाल ग्लोबल कुलिंगच्या दिशेने सुरू असल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला आहे. औंधकर यांच्या निष्कर्षास अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेच्या (नासा) सोलर डायनामिक ऑब्झरवेटरी प्रयोगशाळेने व टिम्ड उपग्रहांनी प्राप्त केलेल्या माहिती वरून पुष्टी मिळत आहे, हे विशेष.
सौर अभ्यासकांनी सौर डागांना साखळ्यांमध्ये विभागले आहे. यात सौर डागांच्या किमान ते कमाल पातळीचा अभ्यास केला जातो. त्यानुसार सध्या सौर डागांची २५ वी साखळी सुरू आहे. १९८५ ते १९९७ दरम्यान २२ वी तर १९९७ ते २००८ दरम्यान २३ वी साखळी सुरू होती. साखळी क्र. २४ थोडी उशीरा म्हणजेच २०१० पासून सुरू झाली. २४ वी साखळी २०२० पर्यंत सुरू राहणार होती. परंतु, नोव्हेंबर २०१८ पासूनच सूर्यावरील हालचाली मंदावल्याचे दिसून आले. यामुळे २०२० च्या डिसेंबरमध्ये सौरडागांच्या साखळी न्यूनतम पातळी पोहचली. २५ वी साखळी कमाल पातळीवर येण्यासाठी साधारणतः ११-१२ वर्षे लागतील, असे औंधकर सांगतात.
मराठवाडा, विदर्भाला फटका
१९८१ पासून सूर्य बिंबांवरील सौर डागांच्या साखळीतील कमाल सौरडागांची संख्या सातत्याने कमी होत चालली आहे. सूर्याकडून येणाऱ्या एकूण सौरवातामध्ये घट होत आहे. सौरडागांची पातळी किमान असताना पृथ्वीवरील किमान तापमानात मोठी घट होत आहे. याचा परिणाम म्हणून वैश्विक किरणांचा मारा वाढण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी लघु हिमयुगाची वाटचाल सुरू झाली आहे. लघु हिमयुगाच्या काळात विषुवृत्तीय ढग उत्तरेकडे सरकतात. आताही हे ढग उत्तरेकडे सरकत आहेत. यामुळे महाराष्ट्राच्या उत्तर भारतात जोरदार पाऊस तर मराठवाडा, विदर्भ, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात दुष्काळाचे संकट उभे राहणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
गेल्या १५ वर्षांपासून सौरडागांच्या अभ्यासातून समोर आलेली माहिती पृथ्वीवासीयांसाठी धक्कादायक आहे. आपण ग्लोबल वॉर्मिंगकडे नव्हे तर ग्लोबल कुलिंगकडे वाटचाल करीत आहोत. सूर्याची हालचाल मंदावल्याने तपमानात घट होऊन एक छोटे हिमयुग अवतरण्याची शक्यता आहे. विषुवृत्तापासून लांब देशांना (ध्रुवीय) कडक हिवाळा तर जवळच्या देशांना कडक उन्हाळ्याचा अनुभव येईल. उन्ह- शाळा परवडला पण हिवाळा नको, अशी परिस्थिती होईल.
– श्रीनिवास औंधकर, खगोल शास्त्रज्ञ.