९ लाखांसाठी परीक्षेत बनला डमी उमेदवार, ब्लूटूथ, मख्खी एअर फोनसह तरुणाला अटक | पुढारी

९ लाखांसाठी परीक्षेत बनला डमी उमेदवार, ब्लूटूथ, मख्खी एअर फोनसह तरुणाला अटक

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा :  नऊ लाख रुपयांच्या बदल्यात सशस्त्र पोलिस दलाच्या परीक्षेत डमी उमेदवार बनून गेलेला तरुण हालचालींमुळे सुरक्षारक्षकांच्या अंगझडतीत जाळ्यात अडकला. त्याच्यासह मूळ परीक्षार्थी अशा दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना बुधवारी (दि. १) आय ऑन डिजिटल झोन या ठिकाणी घडली. अविनाश सजन गोमलाडू (२१, रा. शिवगाव, ता. वैजापूर) असे डमी उमेदवाराचे नाव आहे. तर विकास शाहूबा शेळके (२३, रा. टाकळी, ता. कन्नड) असे परीक्षार्थीचे नाव आहे. या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

केंद्रीय सशस्त्र पोलिस दल, एसएसएफमध्ये कॉन्स्टेबल, आसाम रायफल्समध्ये रायफल्समॅन आणि नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये शिपाई या पदासाठीची परीक्षा चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील आय ऑन डिजिटल झोन या ठिकाणी बुधवारी (दि. १) सकाळी ९ ते १० वाजेच्या दरम्यान आयोजित केली होती. यावेळी ८०० पैकी ५३३ परीक्षार्थी हजर होते. हॉलमध्ये सोडताना उमेदवारांची अंगझडती घेताना सुरक्षारक्षकास एका परीक्षार्थीची संशयित हालचाल दिसून आली. तेव्हा त्या उमेदवाराची बारकाईने अंगझडती घेतली असता त्याच्याकडे अत्याधुनिक यंत्रे सापडली. तसेच तो चौकशीत डमी असल्याचेही समोर आले. सुरक्षा रक्षकाने त्याला सरळ केंद्रावरून डमी उमेदवार अविनाशला थेट पोलिस ठाण्यात नेले. चौकशी अंती मूळ परीक्षार्थीलाही गुरुवारी अटक करण्यात आली.

अंगझडती घेताना मख्खी एअर फोन सापडला

डमी उमेदवार अविनाश गोमलाडू याची परीक्षा हॉलमध्ये अंगझडती घेतल्यानंतर त्याच्याकडे ४ हजार रुपये किमतीचे एटीएम ट्रान्समीटर, ब्लुटुथ डिव्हाईस, मख्खी एअर फोन, मोबाइल आढळून आला. त्याशिवाय मूळ उमेदवाराची कागदपत्रेही अविनाश याच्याकडे सापडली. हायटेक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तो बाहेरून प्रश्नाची उत्तरे मागविणार होता. या प्रकरणाचा अधिक तपास एमआयडीसी सिडको पोलीस करत आहेत.

Back to top button