मराठवाड्यात विक्रम काळेंचा विक्रम; शिक्षक मतदार संघात चौथ्यांदा विजयी | पुढारी

मराठवाड्यात विक्रम काळेंचा विक्रम; शिक्षक मतदार संघात चौथ्यांदा विजयी

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : मराठवाडा शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार विक्रम काळे यांनी सलग चौथ्यादा विजय मिळविला आहे. त्यांनी भाजपचे उमेदवार किरण पाटील यांचा ६ हजार ९३४ मतांनी पराभव केला आहे. १३ व्या बाद फेरीत अपक्ष उमेदवार यांच्या मतांच्या मोजणीनंतर काळे यांना २३ हजार ५७७ तर पाटील यांना १६ हजार ६४३ मते मिळाली. दरम्यान वैध मतांनुसार विजयासाठी २५ हजार३८६ मतांचा कोटा निश्चित झाला होता. परंतु दोन्ही उमेदवारांना हा कोटा पूर्ण करता आला नाही. मात्र काळे यांनी अधिक मते मिळवल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले.

मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार विक्रम काळे यांची चौथ्यांदा विजयाच्या दिशेने घोडदौड. सोमवारी या निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर गुरुवारी (दि. २) सकाळी ८ वाजेपासून चिकलठाणा एमआयडीसीतील रिअल्टर्स प्रा. लि. कंपनीच्या इमारतीमध्ये मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली. यात पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पूर्ण झाली. त्यात ५० हजार ७७१ मते वैध ठरली. तर २४८५ मते अवैध ठरली. वैध मतांच्या निश्चितीमुळे विजयासाठी २५३८६ एवढ्या मतांचा कोटा निश्चित करण्यात आला. पहिल्या पसंतीच्या फेरीत राष्ट्रवादीचे काळे यांना पहिल्या पसंतीची २० हजार ७८ मते मिळाली, तर मराठवाडा शिक्षक संघाचे अपक्ष उमेदवार सूर्यकांत विश्वासराव यांना १३५४३ आणि भाजपचे उमेदवार किरण पाटील यांना १३४८९ मते मिळाली आहेत. त्यानुसार पहिल्या फेरीतच काळेंनी ६ हजार ५३५ मतांची आघाडी घेतली.

या निकालानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. उमेदवारांच्या समर्थकांसह पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणी स्थळी जोरदार घोषणा देत परिसर दाणून टाकला. तर किरण पाटील हे तिसऱ्या क्रमांकावर गेल्याने भाजपच्या गोटात निराशा पसरली होती. दरम्यान, सायंकाळी ५ वाजेपासून इलेमिनेशन राउंडला सुरुवात करण्यात आली. यात ज्या उमेदवाराला सर्वांत कमी मते मिळाली, त्यांची दुसऱ्या पसंतीची मते कोणत्या उमेदवाराला गेली. त्याची मोजणी करून, त्या उमेदवारास बाद करण्यात आले. यात पहिल्यांदा प्रा. अश्विनकुमार क्षीरसागर यांच्या मतांची मोजणी करण्यात आली. त्यात काळे यांना १, विश्वासराव यांना शून्य आणि पाटील यांना एक मत मिळाले. तर दुसऱ्या बाद फेरीत आशिष देशमुख यांच्या मतांची मोजणी करण्यात आली. त्यात काळेंना ३ तर पाटील यांना २ आणि विश्वासराव यांना शून्य मते मिळाली असून, सहाव्या बाद फेरीपर्यंत तेच आघाडीवर होते. दरम्यान, शेवटच्या बाद फेरीपर्यंत काळे यांची आघाडी कायम होती.

भाजपची नामुश्की टळली 

भाजपचे उमेदवार किरण पाटील हे पहिल्या पसंतीच्या मतमोजणीपासून ते अकराव्या बाद फेरीपर्यंत तिसऱ्या क्रमांकावर होते. परंतु १२ व्या बाद फेरीत त्यांना दुसऱ्या क्रमांकावर असलेले अपक्ष उमेदवार सूर्यकांत विश्वासराव यांच्यापेक्षा अधिक मते मिळाली. त्यामुळे बाद फेरीतसह तिसऱ्या क्रमांकावर राहण्याची नामुश्की टाळता आली.

Back to top button