तुळजापूर यात्रा रद्द, दर्शनास मात्र मुभा | पुढारी

तुळजापूर यात्रा रद्द, दर्शनास मात्र मुभा

तुळजापूर ; पुढारी वृत्तसेवा : राज्य शासनाने मंदिर उघडण्याच्या अनुषंगाने निर्देश दिल्यामुळे तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानतर्फे आयोजित करण्यात येणार्‍या शारदीय नवरात्र महोत्सवाची पूर्व तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यानिमित्ताने मंदिर संस्थानचे प्रतिनिधी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित अधिकार्‍यांची बैठक मंगळवारी झाली. या बैठकीत तीन दिवसीय यात्रा न भरविता कोरोना नियम पाळून भाविकांना दर्शन करण्यास मुभा देण्याचा निर्णय झाला.

जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. आमदार राणा जगजितसिंह पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक नीवा जैन, तुळजापूरचे तहसीलदार तथा विश्वस्त सदस्य सौदागर तांदळे, तहसीलदार तथा व्यवस्थापक मंदिर संस्थान योगिता कोल्हे, पोलिस अधिकारी काशीद आदी उपस्थित होते.

नवरात्र महोत्सवातील सर्व पूजा, विधी सर्व प्रकारचे पावित्र्य राखण्यात येईल. भक्तांना दर्शनाची सोयही कोरोनाचे नियम पाळून करण्यात येणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तुळजापूर शहरात कोरोना लसीकरणाचे विशेष शिबीर घेण्यात येणार आहे.

प्रामुख्याने पुजारी, सेवेकरी आणि मानकर्‍यांबरोबरच संबंधित प्रशासकीय अधिकारी, मंदिर संस्थानशी संबंधित कर्मचार्‍यांचे आणि नागरिकांचे लसीकरण करण्यास भर देण्यात येणार आहे.

नवरात्र महोत्सव काळातील यात्रा बंदी असली तरी पुजारी, सेवेकरी आणि मानकर्‍यांकडून करण्यात येणारी पूजा आणि इतर विधी कोरोनाचे सर्व नियम पाळून करण्यात येणार आहे, असे सांगून यानिमित्त आवश्यक त्या सर्व प्रकारच्या आपत्ती व्यवस्थापनाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

* या महोत्सवानिमित्त सुरक्षेच्या अनुषंगाने मंदिरातील सीसीटीव्हीचे काम व्यवस्थीत सुरू असल्याची खात्री करून घेण्यात आली आहे.तसेच नगरपालिकेने बसविलेले काही ठिकाणचे सीसीटीव्ही सुरू करण्याची गरज असेल तर तेही काही मंदिर संस्थानतर्फे करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.या महोत्सवानिमित्त वेळोवेळी जारी करण्यात येणार्‍या आदेशांचे आणि सूचनांचे संबंधित अधिकार्‍यांनी काटेकोरपणे पालन करावे, अन्यथा संबंधितावर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंर्तगत कारवाई करण्यात येईल, असेही दिवेगावकर यांनी सांगितले.

Back to top button