Vande Bharat : लातूरमध्ये होणार ‘वंदे भारत’ ची निर्मिती, रोजगाराची मोठी संधी | पुढारी

Vande Bharat : लातूरमध्ये होणार 'वंदे भारत' ची निर्मिती, रोजगाराची मोठी संधी

सांगली पुढारी वृत्तसेवा : वंदे भारत एक्स्प्रेस Vande Bharat आणि वंदे भारत मेट्रोच्या माध्यमातून देशभरात रेल्वेचे जाळे निर्माण करण्यात येणार आहे. सध्या चेन्नई येथे करण्यात येत असलेली वंदे भारत एक्स्प्रेसची निर्मिती महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यामध्ये करण्यात येणार आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स आणि पुणे रेल्वे स्थानकांचा अमृत भारत योजनेंतर्गत पुनर्विकास करण्यात येणार आहे.

२०२३ – २४ चे रेल्वे बजेट बुधवारी जाहीर करण्यात आले. यामध्ये रेल्वेसाठी दोन लाख ४१ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. २०१३ ते १४मध्ये करण्यात आलेल्या रेल्वे तरतुदीच्या तब्बल नऊ पट तरतूद रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात आली आहे.
देशभरात २०२३ – २४ मध्ये सहाशे किलोमीटर नवीन रेल्वे मार्ग, दीडशे किलोमीटर रेल्वेमार्गाचे रूपांतरण आहे. आणि तब्बल २ हजार ८०० किलोमीटर रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण करण्यात येणार आहे. यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. Vande Bharat

देशभरात वंदे भारत एक्सप्रेसला मोठा प्रतिसाद मिळत आहे. वंदेभारत एक्स्प्रेस आणि वंदे भारत मेट्रोच्या माध्यमातून देशभरात रेल्वेचे जाळे निर्माण केले जाणार आहे. देशाचा प्रत्येक कोपरा रेल्वेने जोडण्यात येणार आहे. यासाठी आता चेन्नईसह महाराष्ट्रातील लातूर, हरियाणा मधील सोनीपत आणि उत्तर प्रदेशमधील रायबरेलीमध्ये वंदे भारत एक्स्प्रेसची निर्मिती करण्यात येणार आहे. लातूरमध्ये वंदे भारत एक्स्प्रेसची निर्मिती होणार असल्याने मोठ्या प्रमाणात रोजगाराचीदेखील संधी निर्माण होणार आहे. यामुळे महाराष्ट्रामध्ये रेल्वेचा विकास झपाट्याने होण्याची शक्यता आहे. Vande Bharat

रेल्वेसह देशभरातील एक हजार २७५ रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. यामध्ये मोठ्या स्थानकांमध्ये येणारे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स, मुंबई आणि मध्यम स्थानकामध्ये येणाऱ्या पुणे रेल्वे स्थानकाचा समावेश आहे. या स्थानकासह महाराष्ट्रातील अन्य स्थानकांचादेखील पुनर्विकास करण्यासाठी रेल्वे बजेटमध्ये भरीव तरतूद करण्यात आली.

रेल्वे बजेटमध्ये रेल्वेच्या अत्याधुनिकीकरणाकडे देखील विशेष लक्ष देण्यात आले असून, दररोज देशात १२ किलोमीटर रेल्वेमार्गाची निर्मिती करण्यात येत आहे. तो पुढील वर्षापर्यंत १६ किलोमीटर प्रतिदिन करण्यासाठी रेल्वेने यावर्षीच्या बजेटमध्ये तरतूद ठेवली आहे.

Vande Bharat : मुंबई, पुणे पुन्हा फास्टट्रॅकवर येणार

मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स आणि पुणे रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास होणार आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स आणि पुणे रेल्वे स्थानकावरून सुटणाऱ्या गाड्यांची संख्या वाढण्यासदेखील मदत होणार आहे. पुनर्विकास अंतर्गत फलाटांची संख्या वाढल्यास महाराष्ट्रातील महत्त्वाच्या स्थानकांना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स आणि पुणे रेल्वे स्थानकाला जोडण्यास मदत होणार आहे. दोन्ही रेल्वे स्थानके मध्य रेल्वेअंतर्गत असून, मध्य रेल्वे देशातील रेल्वेच्या फास्टट्रॅकवर येणार आहे.

Vande Bharat : डिसेंबरमध्ये हायड्रोजन रेल्वे धावणार

यंदाच्या रेल्वे बजेटमध्ये ग्रीन बेस प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात प्राधान्य देण्यात आले आहे. भारतामध्ये हायड्रोजन रेल्वे सुरू करण्यासाठी भारत सरकारचे प्रयत्न सुरू होते. त्याची स्वप्नपूर्ती झाल्याचे दिसून येते. यासाठी चालू वर्षाच्या बजेटमध्ये तरतूद करण्यात आली असून ग्रीन बेस प्रकल्पांतर्गत डिसेंबर २०२३ मध्ये देशात पहिली हायड्रोजन रेल्वे धावणार असल्याचे रेल्वे मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आले.

Vande Bharat : महाराष्ट्रात बुलेट ट्रेनचे जाळे उभारणार

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार असताना या सरकारने बुलेट ट्रेनला विरोध केला होता. परंतु, महाराष्ट्रात सत्तापालट झाले असून बुलेट ट्रेनमधील अडथळे दूर झाले आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्रात बुलेट ट्रेनचे जाळे निर्माण केले जाणार असल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केले. महाराष्ट्रातील बुलेट ट्रेनसाठी मोठी तरतूद देखील केली आहे. बुलेट ट्रेनचे जाळे निर्माण झाल्यास दळणवळणाची संधी मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहे.

हे ही वाचा :

Avalanche : काश्मीरच्या गुलमर्गमध्ये हिमस्खलन, दोन विदेशी नागरिकांचा मृत्यू, 21 जणांची सुटका

Hasan Mushrif : विघ्नसंतुष्टांनी निर्माण केलेल्या गैरसमजाचे निराकरण होईल : हसन मुश्रीफ

Back to top button