

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : उद्धव ठाकरे हे अतिशय सामंजस्याने काम करणारे, सालस असे नेतृत्व आहे. ते मुख्यमंत्रिपदावर असताना, त्यांच्या डोळ्यादेखत ४०-५० लोक निघून गेले. ते त्यांनी थांबविले असते, मुख्यमंत्र्यांमध्ये तेवढी शक्ती असते. तेवढी यंत्रणा असते, परंतु त्यांनी हे कदापि केले नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या दाव्यात कुठलेही तथ्य नाही, असे म्हणत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी फडणवीस यांचा दावा खोडून काढला.
विभागीय आयुक्तालयात बुधवारी (दि. २५) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजनेची राज्यस्तरीय बैठक झाली. यावेळी पत्रकारांनी दानवे यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले, की राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही स्पष्ट केलेले आहे, की अशा प्रकारे महाविकास आघाडीचा असा कोणताही प्रयत्न नव्हता. महाविकास आघाडीच्या काळात अटक करून जेलमध्ये टाकण्याच्या हालचाली सुरू होत्या. अशा देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपात कुठलेही तथ्य नाही. असे षड्यंत्र भाजप करते. ईडीच्या माध्यमातून भाजपने हे असले प्रयत्न केले आहेत. राज्यात सध्या असलेले भाजप- शिंदे सरकार हे असंवैधानिक सरकार आहे, आम्ही हे नेहमीपासूनच म्हणतो आहोत. कारण, सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपाल संबंधित पक्षाला निमंत्रित करतात, मात्र या सरकारला राज्यापालांचे सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण नव्हते, हे माहिती अधिकारातून उघड झाले असल्याचे मी वाचले आहे. त्याविषयी माझ्याकडे काही माहिती नाही.
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत दानवे म्हणाले की, १६ आमदारांनी पक्षांतर केलेले आहे, त्यांच्यावर कारवाई होईल, हे प्रकरण न्यायालयात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्षकांना पेन्शन लागू करण्याची केलेली घोषणा आच- रसंहितेचा भंगच आहे. त्यांनी नियम पाळले नसतील, पण मी नियम पाळेन. निवडणुका सुरू आहेत, या सरकारविरोधात शिक्षक, पदवीधरांमध्ये रोष आहे, त्यामुळे त्यांनी अशाप्रकारे घोषणा केली असावी, ही घोषणा निवडणूक आचारसंहितेचा भंग ठरते, असे दानवे म्हणाले.