…तर राज्यात फेब्रुवारीनंतर आगडोंब उसळेल : रविकांत तुपकर यांचा एल्गार मोर्चात इशारा | पुढारी

...तर राज्यात फेब्रुवारीनंतर आगडोंब उसळेल : रविकांत तुपकर यांचा एल्गार मोर्चात इशारा

मानवत; पुढारी वृत्तसेवा : कापूस व सोयाबीनच्या दरवाढीबाबत शासनाने येत्या १० ते १२ दिवसांत निर्णय न घेतल्यास फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात राज्यात मोठे आंदोलन करण्यात येईल. त्यानंतर राज्यभरात आगडोंब उसळेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी दिला. मानवत येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज (दि. २३) काढलेल्या एल्गार मोर्चात ते मार्गदर्शन करताना बोलत होते. शहरातील नगरपालिका पासून काढण्यात आलेल्या मोर्चाची सांगता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ सभेत झाली.

ते म्हणाले की, केंद्र सरकारने कापसाच्या निर्यातीला प्रोत्साहन दिले पाहिजे आणि ११ टक्के आयात शुल्क कायम ठेवेल पाहिजे. कापसाची एकही गाठ भारतात आयात केली गेली नाही पाहिजे. सोयाबीनच्या दरवाढीसाठी सोयापेंडीच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. तसेच केंद्र शासनाने १५ लाख मेट्रिक टन डीओसीची निर्यात करावी आणि पामतेल आणि खाद्यतेल आयात शुल्क २० टक्क्यांवर आणावे.

शेतपंपासाठी आगाऊ पैशाची मागणी केल्यास हाती रुमणे घ्यावे. शेतकऱ्यांच्या मुलांनी कुठल्याही राजकीय पक्षाच्या हाताचे बाहुले होण्यापेक्षा शेतीचे प्रश्न सोडवण्यासाठी संघटीत व्हावे. कापसाला दरवाढ देण्यासाठी शासनाने लवकरात लवकर पाउले उचलावीत. अन्यथा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यासाठी राज्यव्यापी आंदोलन उभारले जाईल

राज्यात अनावश्यक विषय चर्चेला

सध्या राज्यात अनावश्यक विषयांची चर्चा होत असून यामुळे मूळ प्रश्न बाजूल पडत आहेत. उर्फी जावेद, आर्यन खान, कंगना राणावत यांच्याबद्दल मोठी चर्चा होते. मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लोकप्रतिनिधी गप्प असतात. हे राज्याचे दुर्दैव असल्याचे तुपकर यांनी सांगितले.

मोर्चात दामू इंगोले, जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, तालुकाध्यक्ष हनुमान मसलकर आदीसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी नायब तहसिलदार नकुल वाघुंडे यांना निवेदन देण्यात आले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button