औरंगाबाद : वाळूज येथे शिर धडावेगळे करून अनोळखी तरुणाचा निर्घृण खून | पुढारी

औरंगाबाद : वाळूज येथे शिर धडावेगळे करून अनोळखी तरुणाचा निर्घृण खून

वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा : वाळूज एमआयडीसीतील फतेजा फोर्जिंग या बंद पडलेल्या कंपनीच्या आवारात २० ते २५ वयोगटातील एका अनोळखी तरुणाचे शीर धडावेगळे करून क्रूरपणे खून करण्यात आला तसेच मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे रविवारी (दि. १५) उघडकीस आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाळूज एमआयडीसीतील फतेजा फोर्जिंग या बंद पडलेल्या कंपनीच्या आवारात रविवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास एका अनोळखी तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती संदीप नरवडे (रा. विटावा) यांनी एमआयडीसी वाळूज पोलिसांना दिली होती. यावरून पोलिस निरीक्षक सचिन इंगोले, दुय्यम निरीक्षक गणेश ताठे, सहायक निरीक्षक मदनसिंग घुनावत, फौजदार सचिन शिंदे, चेतन ओगले आदींनी घटनास्थळी धाव घेतली असता, कंपनीच्या आवारातील खड्डयात वाळलेल्या कटेरी झुडपाच्या खाली एका अनोळखी तरुणाचे तीक्ष्ण हत्याराने शीर कापून ते धडावेगळे केल्याचे दिसून आले. तसेच मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मारेकऱ्याने मृतदेहावर वाळलेली काटेरी झुडपे टाकून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले.

या प्रकरणी फौजदार संदीप शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, दुय्यम पोलिस निरीक्षक गणेश ताठे तपास करीत आहेत.

श्वान पथक घुटमळले

अर्धवट अवस्थेत जळालेल्या अनोळखी मृत तरुणाच्या उजव्या हातावर छत्रपती, असे नाव गोंदलेले असून डाव्या हाताच्या बोटात अंगठ्या आहेत. द फॉरेन्सिक लॅब पथकाचे अविनाश पारगावकर, अभिजित खोतकर यांनी घटनास्थळावरून रक्ताचे नमुने, प्लास्टिक पिशवी व जळालेले अवशेष तपासणीसाठी घेतले आहे. मारेकऱ्यांचा माग काढण्यासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. मात्र, माग काढता आला नाही.

Back to top button