Hingoli Crime: पिंपळदरीच्या जंगलात आढळला अल्पवयीन मुलीचा मृतदेह | पुढारी

Hingoli Crime: पिंपळदरीच्या जंगलात आढळला अल्पवयीन मुलीचा मृतदेह

औंढा नागनाथ; पुढारी वृत्तसेवा : औंढा नागनाथ तालुक्यातील (Hingoli Crime) पिंपळदरी शिवारातील जंगलात एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह आज (दि.१४) दुपारी आढळून आला. कळमनुरी पोलिसांचे पथक तत्‍काळ  घटनास्थळी रवाना झाले. दरम्यान, सोशल मीडियाच्या माध्यमातून छायाचित्र प्रसिद्ध केल्यानंतर मुलीची ओळख पटली असल्याचे पोलिसांनी सांगितले. कोमल मारोती मार्कड (वय १३) असे तिचे नाव आहे. ती पिंपळदरी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये सातवी वर्गात शिकत होती.

याबाबत अधिक माहिती अशी, औढा नागनाथ तालुक्यातील (Hingoli Crime) पिंपळदरी शिवारात काही भागात जंगल आहे. याठिकाणी गुराखी शेळ्या चारण्यासाठी जातात. नेहमीप्रमाणे एक महिला या भागात शेळ्या चारण्यासाठी गेली होती. त्यावेळी एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आला.महिलेने परिसरातील शेतकर्‍यांना या घटनेची माहिती दिली. या प्रकाराची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी तातडीने कळमनुरी पोलीस ठाण्याच्या पथकाला घटनास्थळी रवाना केले.

पोलीस निरीक्षक सुनील निकाळजे, उपनिरीक्षक कृष्णा सोनुळे, जमादार गजानन होळकर, जगन पवार, यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली.  मुलीच्या मृत्यूचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. उत्तरीय तपासणी झाल्यानंतरच मृत्‍यूचे कारण स्‍पष्‍ट होईल, असे पोलिसांनी म्‍हटले आहे.

हेही वाचा : 

Back to top button