औरंगाबाद : तुमचे वाघ तुम्हीच आणून सोडा ! | पुढारी

औरंगाबाद : तुमचे वाघ तुम्हीच आणून सोडा !

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा :  महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयातील दोन वाघिणी अहमदाबाद येथील प्राणिसंग्रहालयाला देण्यात येणार आहेत, तर तेथून कोल्हा, इमू यांसह इतर काही प्राणी औरंगाबादेत आणण्यात येणार आहेत. मात्र, आता प्राण्यांच्या या हस्तांतरणाबाबत अहमदाबाद येथील प्राणिसंग्रहालय प्रशासन उदासीन असल्याचे दिसून येत आहे. आमच्याकडील वाघ घेऊन जाण्यासाठी कधी येणार ? अशी विचारणा महापालिकेकडून करण्यात आली. त्यावर तुमचे वाघ तुम्हीच आणून सोडा, अशी भूमिका अहमदाबादच्या प्रशासनाने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयात तीनशेहून अधिक प्राणी आहेत. बहुतेक प्राण्यांच्या जोड्या आहेत, परंतु सायाळ, स्पूनबिल पक्षी, इमू आणि कोल्हा हे प्राणी मात्र एकेकच आहेत. त्यांना जोडीदार नाहीत. त्यांना जोडीदार मिळविण्यासाठी महापालिकेचे प्रशासन प्रयत्नशील होते. गुजरातमधील अहमदाबाद येथील प्राणिसंग्रहालयाने हे प्राणी देण्याची तयारी दर्शविली होती, परंतु त्याबदल्यात त्यांनी दोन पिवळ्या वाघिणी देण्याची अट टाकली होती. दोन्ही ठिकाणच्या प्राणिसंग्रहालय प्रशासनांत त्याबाबत चर्चा झाल्यानंतर त्याबाबतचा प्रस्ताव ७ जुलै २०२२ रोजी केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडे पाठविण्यात आला. त्याला प्राधिकरणाने ७ जुलै, ऑक्टोबर २०२२ रोजी मान्यता दिली.

त्यानंतर प्राणिसंग्रहालय प्रशासनाने प्राण्यांचे प्रत्यक्ष हस्तांतरण करण्याचा प्रस्ताव मनपा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे सादर केला होता. त्याला चौधरी यांनी महिनाभरापूर्वीच मंजुरी दिली. त्यामुळे डिसेंबर २०२२ मध्येच हे हस्तांतरण होईल अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, अहमदाबाद येथील पथक अजूनही वाघिणी नेण्यासाठी आलेले नाही. महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी तेथील अधिकाऱ्यांशी संपर्क करून वाघिणी घेऊन जाण्यासाठी कधी येणार अशी विचारणा अनेकवेळा केली. त्यावर सुरुवातीला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. तर आता तुमच्याकडील वाघिणी तुम्हीच आणून सोडा, अशी भूमिका तेथील अधिकाऱ्यांनी घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे प्राण्यांचे हस्तांतरण रखडले आहे.

Back to top button