परभणीत शिवपुराणासाठी मुस्लिम व्यावसायिकाने दिली जागा; 18 एकरवरील तूर, हरभर्‍यावर फिरवला नांगर | पुढारी

परभणीत शिवपुराणासाठी मुस्लिम व्यावसायिकाने दिली जागा; 18 एकरवरील तूर, हरभर्‍यावर फिरवला नांगर

परभणी; पुढारी वृत्तसेवा :  येत्या 13 ते 17 जानेवारी दरम्यान परभणीत पंडित प्रदीप महाराज मिश्रा यांचे शिवपुराण आयोजित करण्यात आले असून त्यासाठी शहरातील एका मुस्लिम बांधवाने आपली 60 एकर जागा देऊ करीत हिंदू मुस्लिम सलोख्याचे दर्शन घडवले आहे.
शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या मोठ्या कार्यक्रमासाठी असणारा जागेचा प्रश्न परभणीतील प्लॉटिंग व्यासायिक हाजी शोएब यांनी सोडविला. त्यासाठी पाथरी रोडवरील आपली 60 एकर जमीन या शिवपुराण कथेसाठी विनामूल्य वापरासाठी दिली. एवढेच नाही तर त्यातील 15 एकर वर त्यांची तूर आणि साडे तीन एकरवर लावलेल्या हरभर्‍यावर त्यांनी नांगर फिरविला.

परभणी डिसेंबर महिन्यात मुस्लिम धर्मियांचा इज्तेमा पार पडला होता. तेव्हा अनेक हिंदू युवकांनी मदत केली होती. आता हिंदू धर्मीयांच्या कार्यक्रमांसाठी मुस्लिम नागरिक पुढे आले आहेत हे विशेष. परभणी हे शहर संवेदनशील म्हणून ओळखले जाते, परंतु हिंदू मुस्लिम एकोप्याचा नवा आदर्श परभणीने आता घालून दिला आहे, असे म्हटले जाते.

सर्वधर्म समभावाची परंपरा आम्ही परभणीकर जपत आलो आहोत. काही दिवसांपूर्वी मुस्लिम धर्मीयांच्या कार्यक्रमासाठी अनेक हिंदू बांधवांनी सहकार्य केले होते. आता या शिवपुराण कथेसाठी त्यांनी पुढाकार घेतला. एकता, बंधुता हेच आमचे वैशिष्ट्य आहे.
-_संजय जाधव,
खासदार, परभणी

Back to top button