उद्योगमंत्री सामंत यांच्या नावाने उकळले २० लाख | पुढारी

उद्योगमंत्री सामंत यांच्या नावाने उकळले २० लाख

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे संपूर्ण काम माझा मुलगा पाहतो अशी थाप मारून ब्यूटीपार्लर चालविणाऱ्या महिलेने एका दाम्पत्याकडून भाच्याला नोकरी लावण्यासाठी २० लाख रुपये उकळले. उर्वरित रकम व नोकरीचा करारनामा १०० रुपयांच्या बॉण्डवर लिहून दिल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून उस्मानपुरा पोलिस ठाण्यात महिलेच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरेखा विवेक काटे (५३, रा. दशमेशनगर) असे आरोपी महिलेचे नाव आहे. एमआयडीसीचे क्षेत्र व्यवस्थापक अशोक रसाळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सुरेखाने १६ सप्टेंबर रोजी दीपाली संदीप कुलकणी व संदीप कमलाकर कुलकणी या दाम्पत्याच्या भाच्यास उद्योग विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखविले. सुरेखाचा मुलगा केदार हा उद्योगमंत्री उदय सामंत यांचे संपूर्ण काम पाहत असल्याचे सांगितले. त्यामुळे कुलकणी दाम्पत्याने सुरेखाला नोकरीसाठी २५ लाख देण्याचे कबूल केले. यातील १६ सप्टेंबर रोजी रोख २० लाख रुपये दिले आणि उर्वरित ५ लाख नोकरीची ऑर्डर मिळाल्यानंतर घेण्याचा करारनामा १०० रुपयांच्या बॉण्ड पेपरवर केला. त्यानुसार, कुलकणी दाम्पत्याने सुरेखाला २० लाख रुपये रोख दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याच कायदेशीर बाजू तपासून आरोपीला अटक करण्यात येईल, अशी माहिती परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त शीलवंत नांदेडकर यांनी दिली. अधिक तपास निरीक्षक गीता बागवडे यांच्या मार्गदर्शनात सहायक निरीक्षक राहुल सूर्यतळ करीत आहेत.

उद्योगमंत्र्यांकडून कारवाईचे आदेश

उद्योगमंत्री उदय सामंत यांना त्यांच्या नावाने कोणीतरी महिला पैसे उकळत असल्याची माहिती मंगळवारी (दि. २७) समजली. त्यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सुरेखा काटेच्या विरोधात कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार, अशोक रसाळ यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार तक्रार नोंदविली.

Back to top button