आरोप करून राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न : एकनाथ शिंदे | पुढारी

आरोप करून राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न : एकनाथ शिंदे

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : विधिमंडळात जनतेच्या प्रश्नांवर चर्चा व्हायला हवी परंतु विरोधकांची चर्चा करण्याची मानसिकताच नाही. केवळ आरोप करून ते वेळ वाया घालवत आहेत. कुठलाही पुरावा नसताना माझ्यावर आरोप करून राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. आमचे सरकार पारदर्शक आहे. आम्हाला त्यांच्यावर आरोप करण्याची गरज नाही. कोर्टाने त्यांना त्यांची जागा दाखविली आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांना उत्तर दिले.

नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने रविवारी औरंगाबादेत महास्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले होते. या अभियानाच्या समारोपासाठी मुख्यमंत्री शिंदे हे रविवारी दुपारी औरंगाबादेत दाखल झाले. यावेळी विमानतळार त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. विधिमंडळ अधिवेशनात विरोधकांनी मराठवाडा, विदर्भातील जनतेचे प्रश्न लावून धरावेत, अशी अपेक्षा आहे. मात्र, ते केवळ आरोप करण्यात विरोधक धन्यता मानत आहेत. आम्ही जनतेच्या प्रश्नावर काम करीत आहोत, विरोधकांकडे कोणताही मुद्दा नाही, जन- तेचे प्रश्न सोडविण्याची त्यांची इच्छा नाही, अशी टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.

विरोधकांनी हिवाळी अधिवेशनात मराठवाडा, विदर्भाच्या प्रश्नावर वाचा फोडायला हवी होती, मात्र विकासावर चर्चा करण्याची त्यांची मानसिकता नाही. त्यांचे काम आरोप करण्याचे आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Back to top button