

गेवराई; पुढारी वृत्तसेवा : अहमदनगर जवळील सुपा येथे दुचाकी दोन ट्रकच्या मधोमध चिरडल्याने भीषण अपघात झाला. यामध्ये गेवराईच्या ट्रकचा चालक व क्लिनरचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (दि २०) दुपारच्या सुमारास घडली. अपघातात ठार झालेले बाप-लेक हे गेवराई तालुक्यातील जातेगाव येथील आहेत.
गेवराई तालुक्यातील जातेगाव येथील राजाभाऊ विष्णुपंत चव्हाण (वय ४०) व त्यांचा मुलगा पुरुषोत्तम राजाभाऊ चव्हाण (१६) हे सुपा अहमदनगर रोडवर जातेगाव नजिक दुचाकीवरुन प्रवास करत होते. यावेळी रोडवर ओव्हरटेक करत असताना त्यांची मोटारसायकल दोन ट्रकच्यामध्ये चिरडली गेली. या अपघातात चव्हाण पिता-पुत्रासह एका ट्रकचा चालक आणि क्लिनर अशा चौघांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती कळताच सुपा पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. यानंतर या चौघांचेही मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पारनेर उपजिल्हा रुग्णालयात येथे नेण्यात आले. सुपा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन गोकवे यांनी ही माहिती दिली.