जालना : लग्नसराईत सोन्याला झळाळी | पुढारी

जालना : लग्नसराईत सोन्याला झळाळी

जालना; पुढारी वृत्तसेवा : लग्नसराईला जोमात प्रारंभ झाला असून, सराफा बाजारात चैतन्याचे वातावरण असून, सोन्या चांदीचे दुकाने गर्दीने फुलून गेल्याचे दिसत आहे. पुढील सहा महिन्यांत तब्बल ४२ लग्न तिथी असून, यामुळे सोन्याला झळाळी येणार आहे. चांदीलाही चांगली मागणी वाढली आहे.

लग्नसमारंभासाठी वधू-वर पक्षांकडून पारंपरिक सोन्याच्या दागिन्यांची मागणी असते. मात्र, सोन्याच्या दरात मोठी वाढ होत असल्याने ग्राहकांना आता सोन्याचे दागिन्यांसाठी ज्यादा पैसे मोजावे लागणार. सराफ बाजारात सोन्याचा प्रति तोळा ५५ हजार (जीएसटीसह ), तर चांदी ६५ हजार रुपये प्रतिकिलो दर होता. दिवाळीनंतर (तुळशी लग्न) सुरू होणाऱ्या लग्नसराईत सराफ व्यवसायात सोन्याचे दागिने खरेदी करता ग्राहकांची गर्दी होत असून, लग्नसमारंभासाठीचे पारंपरिक दागिन्यांना नेहमीच मोठी मागणी असल्याने सराफ बाजारात मोठी आर्थिक उलाढाल होते.

सध्या वधू-वरांकडून हलक्या वजनाची सोने आणि चांदीचे विविध दागिन्यांना पसंती मिळत असल्याने, स्थानिक सुवर्णकारांना सोन्या-चांदीचे दागिने घडवण्याचे काम मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे सुवर्णकारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, लग्नसराईत सोन्याचे दर दिवाळीदरम्यान ५१ हजार रुपये होते. मात्र, एक महिन्यात सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे चार हजारांनी वाढल्याने ग्राहकांना आता लग्नाचे दागिने खरेदी करताना जास्त पैसे मोजावे लागत आहेत. सध्या सोन्याचे भाव ५५ हजार रुपयांचा घरात पोहचले आहे. महिनाभरापासून सोन्याचे भाव सातत्याने वाढत आहे. सध्या लग्नसराई सुरू झाली असल्याने सराफा बाजारात चैतन्य संचारले आहे. वधू-वराचे दागिने खरेदी करण्यात येत आहे. परंतु ग्रामीण भागातील ग्राहकी सराफा बाजार नसल्याने व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.

गेल्या महिन्याभरापासून सोने- चांदीच्या दरात चढ-उतार सुरू आहे. सध्या लग्नसराई सुरू खरेदीस नागरिक येत आहे. परंतु पाहिजे तशी ग्राहकी मार्केटमध्ये नाही. नवीन वर्षात सोने खरेदीस प्रतिसाद मिळेल. मकर संक्रांत सण जवळ आल्याने महिला सोने खरेदीस प्राधान्य देतील.
– भरत गादिया, संचालक भरत ज्वेलर्स, जालना

Back to top button