जालना : रुई येथील व्यापाऱ्याचे मित्रांकडून अपहरण | पुढारी

जालना : रुई येथील व्यापाऱ्याचे मित्रांकडून अपहरण

सुखापुरी: पुढारी वृत्तसेवा : एका व्यापाऱ्याचे त्यांच्याच मित्रांनी अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. नंदू सोनाजी राजगुरू (रा. रुई, ता. अंबड) असे अपहरण केलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी नंदू राजगुरूची पत्नी सविता राजगुरू यांनी गोंदी पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री तक्रार दाखल केली. त्यानंतर ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रुई (ता.अंबड) येथील रहिवासी असलेले नंदू सोनाजी राजगुरू यांचे तीर्थपुरी येथे कापूस व इतर भुसार मालाचा खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. सोमवारी रात्री कुटुंबासह ते घरी झोपलेले होते. दरम्यान, त्यांच्या घरी कधीही न येणारे त्यांचे मित्र हरूण सुलतान शेख (रा. दाढेगाव ता. अंबड), संदीप एकनाथ लहामगे (रा. दहिगाव, ता. अंबड), विष्णू सांगळे (रा. बनगाव, ता. अंबड), गंगाधर आमटे व कैलास आमटे (रा. वडीलासुरा, ता. अंबड) सोमवारी पहाटे साडे पाचच्या सुमारास आले. त्यांनी दरवाजा ठोठावून नंदू राजगुरू यांना आवाज दिला.

यावेळी त्यांची पत्नी सविता राजगुरू यांनी दरवाजा उघडून बाहेर आल्या. त्यानंतर त्यांनी नंदू राजगुरू यांच्याशी चर्चा केली. आणि त्यांनी आणलेल्या चारचाकी गाडीमध्ये नंदू राजगुरू यांना बसवून घेऊन गेले. दरम्यान, सायंकाळपर्यंत नंदू राजगुरू घरी परत न आल्याने सविता राजगुरू यांनी गोंदी पोलीस स्टेशनमध्ये सोमवारी रात्री उशिरा तक्रार दिली. या फिर्यादीवरून पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास गोंदी पोलीस करत आहेत. आर्थिक देवाण-घेवाणीच्या कारणावरून नंदू राजगुरू यांचे अपहरण केल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button