नांदेड : महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला आता मराठवाड्यामध्ये बहर : युवा शेतकऱ्याच्या प्रयत्नांना यश (Strawberry) | पुढारी

नांदेड : महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला आता मराठवाड्यामध्ये बहर : युवा शेतकऱ्याच्या प्रयत्नांना यश (Strawberry)

बारड : पुढारी वृत्तसेवा : स्ट्रॉबेरीचे (Strawberry) पीक प्रामुख्याने हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब या उत्तरेकडील राज्याबरोबर महाराष्ट्रातील महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणी प्रामुख्याने घेतले जाते. परंतु मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील बारड या गावात स्ट्रॉबेरी पिकाची लागवड केली आहे. उपक्रमशील युवा शेतकरी बालाजी मारोतीअप्पा उपवार यांनी स्ट्रॉबेरीचे भरघोस उत्पादन मिळवण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे. एकूण १० गुंठे क्षेत्रावर केलेल्या लागवडीतून दिवसाकाठी १५ किलो स्ट्रॉबेरी मिळवत आहेत. स्थानिक बाजारपेठेबरोबरच नाशिक, पूणे, सोलापूर आदी ठिकाणाहून त्यांच्या स्ट्रॉबेरीला मागणी येत आहे. स्ट्रॉबेरी या पिकासाठी सेंद्रिय खते, जैविक कीटकनाशके यांचा उपयोग केला जात आहे.

स्ट्रॉबरीची (Strawberry) थेट बांधावरून मागणी होत आहे. खरेदीसाठी ३ ते ५ दिवसाची प्रतीक्षा करण्यासाठी ग्राहक स्वखुशीने तयार आहेत. साधारणपणे ३०० ते ४०० रुपये प्रति किलो याप्रमाणे स्ट्रॉबेरीला बाजारभाव मिळत आहे. त्यांच्या स्ट्रॉबेरीला स्थानिक ग्राहकांकडून अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्हा कृषी अधीक्षक, तालुका कृषी अधिकारी, कृषी क्षेत्रातील तज्ञ मंडळी, कुतूहल असणारे शेतकरी त्यांच्या शेतावर भेट देऊन स्ट्रॉबेरी लागवडीचे तंत्र जाणून घेत आहेत. नाविन्याचा ध्यास, पिकाचे योग्य व्यवस्थापन, आणि मेहनत घेण्याची तयारी असेल. तर जमिनीच्या कमी क्षेत्रातही भरपूर उत्पन्न मिळवता येते, असे बालाजी उपवार यांनी दाखवून दिले आहे.

शेतीकडे बेभरवशाचा व्यवसाय म्हणून पाहिले जाते. परंतु असे नाविन्यपूर्ण पीक घेऊन शेतीतूनही चांगले उत्पन्न मिळवता येते. शेती क्षेत्राबाबत असलेली उदासिनता झटकून शेतकरी बांधवांनी, आधुनिक तंत्रज्ञानाने शेती करत, अशा बहुपयोगी पिकाची लागवड करून आपल्या उत्पन्नात वाढ करावी, असा सल्ला बालाजी उपवार यांनी दिला आहे.

गेल्या वर्षीच्या यशस्वी उत्पादनानंतर याही वर्षी स्ट्रॉबेरीची लागवड १५ गुंठे क्षेत्रावर करण्यात आली. ५ फूट अंतराच्या बेडवर १.२५ फूट या अंतरावर रोपांची लागवड केली. स्वित्झर्लंड देशाच्या विंटर डाऊन या जातीचे ७५ ०० रोपांची लागवड केली आहे.
– बालाजी उपवार, युवा शेतकरी, बारड

हेही वाचलंत का ? 

Back to top button