हिंगोली : रुग्णवाहिका- ट्रकच्या धडकेत २ ठार, ५ जखमी | पुढारी

हिंगोली : रुग्णवाहिका- ट्रकच्या धडकेत २ ठार, ५ जखमी

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा: डोंगरकडा ते नांदेड मार्गावर हिवरा पाटीजवळ रुग्णवाहिका व हायवा ट्रक यांच्यात झालेल्या धडकेमध्ये रुग्णवाहिकेच्या चालकासह अन्य एकाचा मृत्यू झाला. तसेच या अपघातात पाच जण जखमी झाले आहेत. जखमीपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले. मंगळवारी (दि.२२) सायंकाळी हा अपघात झाला.

कळमनुरी तालुक्यातील हिवरा येथील किसन गोवंदे यांना एका ऑटोने धडक दिल्याने ते जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी डोंगरकडा येथे आणण्यात आले होते. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना डोंगरकडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेने पुढील उपचारासाठी नांदेड येथे नेले जात होते. डोंगरकडा येथून निघालेली रुग्णवाहिका काही अंतरावर असलेल्या हिवरा फाट्याजवळ गेली असताना समोरून येणाऱ्या हायवा ट्रकची रुग्णवाहिकेला जबर धडक बसली. या अपघातात रुग्णवाहिकेचा चालक बळीराम वाघमारे (रा. डोंगरकडा) यांचा जागीच मृत्यू झाला. तर रुग्णवाहिकेतील इतर सहा जण गंभीर जखमी झाले.

अपघात माहिती मिळताच आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिसांनी यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सर्व जखमींना दुसऱ्या वाहनाने उपचारासाठी नांदेडला हलवले. मात्र, रस्त्यातच किशन गोवंदे यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. तर उर्वरीत पाच जणांना नांदेड येथे उपचारासाठी दाखल केले आहे. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अधिक वाचा :

Back to top button