बुलढाणा : स्थानकातून चोरलेली एसटी बस वाटेतच बंद पडली अन् | पुढारी

बुलढाणा : स्थानकातून चोरलेली एसटी बस वाटेतच बंद पडली अन्

बुलढाणा; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील देऊळगावराजा बस स्थानकावरून मध्यरात्रीला अज्ञात चोरट्याने एसटी बस पळवून नेली. मात्र, काही अंतरावर बसमध्ये बिघाड झाल्याने ती वाटेतच सोडून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. स्थानकावर मुक्कामी थांबलेल्या चालक-वाहकांना पहाटे झोपेतून उठल्यानंतर त्याची बस जागेवर दिसून न आल्याने खळबळ उडाली होती. त्यांनी देऊळगावराजा पोलीसांकडे धाव घेऊन बस चोरीला गेल्याची तक्रार नोंदवली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चिखली आगाराची एसटी बस (क्र. एमएच ०७ ही ९२७३ ) ही मध्यरात्रीला देऊळगावराजा बसस्थानकावर उभी ठेऊन संबंधित चालक व वाहक हे स्थानकाच्या वाहतूक नियंत्रण कक्षात मुक्कामी थांबलेले होते. ते दोघेही गाढ झोपेत असताना अज्ञात चोरट्याने मध्यरात्रीच्या सुमारास सदर बस चालू करून चोरीच्या उद्देशाने स्थानकावरून पळवून नेली. आज पहाटे ड्युटीवर जाण्यासाठी झोपेतून जागे झालेल्या चालक-वाहकांना त्यांच्या ताब्यातील एसटी बस जागेवर न आढळल्यामुळे खळबळ उडाली होती.

तात्काळ याबाबत पोलिसांत तक्रार दिल्यानंतर परिसरात बसची शोधाशोध करण्यात आली. यानंतर ही बस चिखली महामार्गावर एक किमी अंतरावर एका गतीरोधकाजवळ आढळून आली. ऐनवेळी इंजिनमध्ये बिघाड झाल्याने चोरलेली बस वाटेतच सोडून देऊन अज्ञात चोरटे पसार झाल्याचे उघडकीस आले. देऊळगावराजा पोलीस या घटनेची चौकशी करीत आहेत.

या घटनेमुळे स्थानकांवर रात्रीला मुक्कामी थांबणा-या एसटी बसेसच्या सुरक्षेचा मुद्दाही समोर आला आहे. मागील महिन्यात जिल्ह्यातील नांदूरा स्थानकावर चालक-वाहक मुक्कामी थांबले असताना तीन एसटी बसमधून डिझेल चोरीला गेल्याची घटना घडली होती.

हेही वाचलंत का? 

Back to top button