परभणी : चारठाणा येथील जीर्ण विद्युत ताराकडे महावितरणचे दुर्लक्ष | पुढारी

परभणी : चारठाणा येथील जीर्ण विद्युत ताराकडे महावितरणचे दुर्लक्ष

चारठाणा; पुढारी वृत्तसेवा: जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथे विद्युत वाहिनीच्या तारा जीर्ण झालेल्या आहेत. त्यामुळे लोंबकाळणाऱ्या तारा तुटून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वर्षभरापूर्वी लोंबकाळणाऱ्या तारांचा ट्रकला स्पर्श झाल्याने दोन जणांना आपला जीव गमवावा लागला होता. तरीही महावितरणचे याकडे दुर्लक्ष होत असून तारा बदलण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याची मागणी नागरिकांतून होऊ लागली आहे.

चारठाणा येथे सोमवारी (दि. १४) सकाळी ८ वाजता अचानकपणे सुतार गल्ली व दीपक भाग्यवंत यांच्या घरासमोर विद्युत तार तुटून रस्त्यावर पडली. सुदैवाने रस्त्यावर कोणी नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. तब्बल दोन तास वीज पुरवठा खंडित झाला. लाईनमन नसल्यामुळे दोन्ही तार रस्त्यावर पडून होत्या. पेठ विभागातील बंजारा मोहल्यातही विद्युत वाहिनीच्या तार खाली लोंबकाळत आहेत. परिणामी दररोज पाच-पाच तास वीज पुरवठा खंडित असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.

चारठाणा येथील ३३ केव्ही उपकेंद्राला परिसरातील २५ ते ३० गावे जोडलेली आहेत. वारंवार लोंबकाळणाऱ्या तारा तुटत असल्याने जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  गावाला फक्त एकच लाईनमन आहे. त्याच्य़ावर कामाचा मोठा ताण पडत आहे. याबाबत महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना वारंवार लेखी, तोंडी कळवले. परंतु, या बाबींकडे कानाडोळा करण्यात येत आहे. त्यातच चारठाणा येथे महावितरण कंपनीचा उपअभियंता नाही. त्यामुळे तक्रार करताना वीज ग्राहकांना अडचणी येत आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button